बंद शटरआड सर्व काही चालू

बीड । वार्ताहर

महाविकास आघाडी सरकारने 14 एप्रिलपासून राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर, कडक निर्बंध लागू केल्यानंतर जिल्ह्यात निर्बंध लागू झाले. मात्र बीड शहरासह जिल्ह्यात कुठेही कडक निर्बंध असल्याचे चित्र गेल्या 14 एप्रिलपासून निदर्शनास आलेले नाही. सर्व काही अलबेल आणि सुरळीत चालू आहे. लोकांची ओरड नसल्याने प्रशासन लॉकडाऊन यशस्वी झाल्याच्या आनंदात असले तरी महसूल आणि पोलीस प्रशासनाने बीडच्या लॉकडाऊनचा चुथडा करुन टाकला आहे. दोन दिवसापूर्वी पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा केली गेली;मात्र हे लॉकडाऊन म्हणजे ‘वरुन कीर्तन आतून तमाशा’प्रमाणे असून मुख्य बाजारपेठेत शटर बंद असले तरी आतमध्ये बिनधास्तपणे व्यवसाय चालू असतो. सर्वच दुकानांमध्ये ही परिस्थिती आहे, त्यामुळे कशाचे लॉकडाऊन ? अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. व्यापार्‍यांच्या कमावू वृत्तीमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोना वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गतवर्षी 23 मार्च रोजी जनता कर्फ्यु झाल्यानंतर जे लॉकडाऊन झाले ते लॉकडाऊन अविस्मरणीय ठरणार आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर 14 एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वीही बीडमध्ये जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. राज्य सरकारने लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध असा शब्द वापरुन या लॉकडाऊनचा अर्थच बदलून टाकला. अर्थात काही जिल्ह्यांमध्ये नियमांनुसार लॉकडाऊन केले जात आहे. मात्र बीडमध्ये महसूल प्रशासनाची हतबलता, पोलीस प्रशासनाची हप्तेखोरी आणि व्यापार्‍यांची खाऊवृत्ती यामुळे लॉकडाऊनचा बोजवारा उडाला आहे. बीड शहरातील सर्वच दुकाने दिवसभर शटर बंद करुन सुरु असतात. हॉटेल देखील समोरुन बंद आतून चालू अशी स्थिती आहे. बार्शी नाका, जालना रोड, नगर रोड आदी मार्गावर असणारे सर्वच हॉटेल आणि धाबे बिनधास्तपणे सुरु आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आहे की नाही असा प्रश्न शहरात प्रवेश करणार्‍या नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. वाळूच्या गाड्या, बांधकामे बिनधास्तपणे चालू आहेत. अवैध वाहतूक देखील चालू आहे. त्यामुळे बंद काय? असा प्रश्न पडतो. मूळातच सर्व काही बंद करुन कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आता खबरदारी घेण्याची गरज आहे. बीडसह तालुका स्तरावरील मुख्य बाजारापेठ आणि मार्ग सोडता तर इतर भागात बिनधास्तपणे राजरोस दुकाने उघडी आहेत. पोलीस केवळ गाडीचे सायरन वाजवून निघून जातात, काही पोलीसांना या संदर्भात विचारणा केल्यानंतर वरुनच आदेश आहेत असे उत्तर दिले जाते. खरे तर बीड शहरातील लॉकडाऊनला कसलाही अर्थ उरला नसून जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या अधिकारात हे लॉकडाऊन रद्द करावे आणि आपली जबाबदारी आपल्यावर असे घोषित करुन सर्व काही सुरळीत करावे अशीही चर्चा शहरामध्ये ऐकण्यास मिळत आहे.

बलभीम चौक ते कारंजाकडेही लक्ष द्या

बीडमधील बलभीम चौक ते कारंजा या दरम्यान फेरफटका मारला तर लॉकडाऊन आहे की नाही असेच चित्र आहे सर्व काही व्यवहार बिनधिक्कतपणे आणि खुलेआमपणे राजरोस चालू आहेत. रस्त्यावर गर्दी देखील तेवढीच आहे. इकडें पोलीसांचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो त्यामुळे या भागातील पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पालकमंत्र्यांनी खडसावल्यानंतर प्रशासन जागे झाले

जिल्ह्यात आणि विशेष करून बीड शहरात बाहेरून शटर बंद व आतून मात्र सगळं सुरू, अशी परिस्थिती आहे, असले मिळमिळ लॉकडाऊन काही कामाचे नाही. पोलीस अधीक्षकांनी स्वतः यात जातीने लक्ष घालून लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी. लॉकडाऊनच्या काळात साखळी तोडायची असेल तर निर्बंधांचे काटेकोर पालन झालेच पाहीजे;असे सक्तीचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक आर. राजा यांना दिले. त्यानंतर रविवारी पोलीसांनी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शटर बंद करुन व्यवसाय करणार्‍या दुकानदारांसह हॉटेलवर कारवाई केली. तसेच अंबाजोगाई शहरातील नवा मोंढा भागातील एक,गुरूवार पेठ येथील एक आणि नगरपरिषद परिसरातील एक अशी तीन दुकाने सील केल्याची कार्यवाही तहसिलदार विपीन पाटील यांनी केली आहे.

बीडमध्ये 20 दुकानदारांवर कारवाई

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या बीड शहरातील 20 दुकानदारांवर पथकाने कारवाई करत या दुकानदारांकडून 40 हजारांचा दंड वसुल केला. तहसीलदार शिरिष वमने, न.प.चे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे आणि शहर ठाण्याचे पो.नि.रवी सानप यांनी संयुक्तपणे ही मोहिम राबवली. यामध्ये अरिहंत फुड, अंबिका मोबाइल शॉपी, स्वस्तिक सिलेक्शन, आकाश एंटरप्रायजेस, पांडुरंग हार्डवेअर, रतन ट्रेडर्स, इंडिया क्लॉथ सेंटर आदी 20 दुकानांवर कारवाई झाली.

बीड शहरातील बार्शी रोडवरील हॉटेल महाराजा पॅलेस रविवारी सील करण्यात आले. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.