विशेष पथकाची कारवाई: संशयित तरुणाला एक दिवसांची कोठडी
शासकीय पुरवठ्याच्या सहा औषधांचासह सापडली 15 औषधी
बीड । वार्ताहर
बीड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री क्रताना तिघांना ताब्यात घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शुक्रवारी (दि.30)रात्री पेठ बीड भागातील एका शेडवजा खोलीतून बेकायदेशीर औषधी साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 15 प्रकारची औषधी जप्त करण्यात आली असून एकास ताब्यात घेत त्याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केल्यानंतर बीडमध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनविण्यासाठी ही औषधी गोळा केली जात असल्याला पुष्टी मिळाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन बनविण्यासाठीच ही सारी औषधी गोळा केली गेली होती का? तसेच शासकीय पुरवठ्याची औषधी त्याच्याकडे कोठून आली या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पो.नि.विश्वास पाटील यांनी सांगीतले.
पोलीसांच्या माहितीनुसार, शेख अखतर शेख रशीद (30, राग़ांधीनगर, बीड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरापासून जवळच अचानकनगरात त्याची जुनी शेडवजा खोली आहे. तेथेे शेख अखतर याने मोठ्या प्रमाणात औषधी साठा केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यानुसार हजारे यांनी सहकार्यांना सोबत घेत शुक्रवारी रात्री शेख अखतर यास ताब्यात घेतले व अचानकनगरातील त्याच्या खोलीची तपासणी केली. यावेळी तिथे विविध 15 प्रकारची औषधी आढळून आली. ही औषधी त्याने बेकायदेशीररीत्या स्वत:च्या ताब्यात ठेवली होती. त्यामुळे औषध प्रशासन विभागाला पत्र देऊन कारवाईबाबत मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी (दि.1) कलम 188, औषध व सौंदर्य प्रशासन अधिनियम 1940, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3 अन्वये पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. औषध प्रशासनचा अभिप्राय येईपर्यंत नोटीस देऊन सोडलेल्या शेख अखतर यास पुन्हा ताब्यात घेऊन रविवारी (दि.2) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Leave a comment