बीड । वार्ताहर
गत दोन दिवसात दोन पोलीस अंमलदारांचा कोरोनामुळे बळी गेला. पोलीस नाईक सुबराव जोगदंड व पोलीस अंमलदार दीपक सुळ अशी त्यांची नावे आहेत. त्यांना वाचविण्यासाठी नातेवाईकांनी शर्थीचे प्रयत्न केले;परंतु दुर्दैवाने ते असफल ठरले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्या पोलिसांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील सात जणांना कोरोनाने हिरावून नेले आहे.
पोलीस नाईक सुबराव जोगदंड (53) हे बॉम्बशोधक व नाशक पथकात कार्यरत होते. 18 एप्रिल रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले व प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुबीयांनी अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविले. तेथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान 30 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सुबराव जोगदंड यांनी दरोडा प्रतिबंधक पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. पोलीस अंमलदार दीपक सुळ (35) हे पोलीस दलाच्या मोटार वाहन विभागात कर्तव्यावर होते. 27 रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 30 एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबार वाजता त्यांचे निधन झाले. 24 तासांत दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने जिल्हा पोलीस दल हळहळले आहे.
बहिणीपाठोपाठ भावाचाही मृत्यू
पोलीस नाईक सुबराव जोगदंड यांच्या बहिणीलाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांचे 28 रोजी निधन झाले होते. पाठोपाठ 30 रोजी सुबराव जोगदंड यांचाही मृत्यू झाला. बहिणीपाठोपाठ भावाने प्राण सोडल्याने जोगदंड कुटुंबावर दु:खाचा दुहेरी आघात झाला.
Leave a comment