गेवराई । वार्ताहर
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील पहिले महिला कोविड केअर सेंटर गेवराई शहरातील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात सुरू करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये केवळ महिला रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.
बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी तालुका पातळीवर कोविड रुग्णांना उपचार आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहेत. यापूर्वी गढी येथे 200 खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर सुरु करून तेथे 20 ऑक्सिजन बेड रुग्णांना उपलब्ध करून दिलेले आहेत. गेवराई शहरातील र. भ.अट्टल महाविद्यालयाच्या मुलींचे वसतीगृह त्यांनी कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देताना या वसतीगृहात केवळ महिलांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ असलेल्या या वसतीगृहात 70 सुसज्ज बेड महिलांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. या ठिकाणी संडास बाथरूम सुविधा असलेल्या एकाच खोलीमध्ये केवळ तीन बेडसह इतर सर्व सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अतिशय प्रशस्त वातावरणातील इमारत केवळ महिला रुग्णांना उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
Leave a comment