18 हॉस्पीटलमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी
बीड । सुशील देशमुख
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. कोरोना बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यासाठी तसेच त्यांचे समुपदेशन व त्यांना कोव्हिड उपचारासाठी अधिगृहित केलेल्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित केली गेली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. सद्य स्थितीत जिल्ह्यातील 18 रुग्णालयातील मंजूर बेड संख्येच्या 80 टक्के बेड महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत कोव्हिड उपचारासाठी अधिगृहित करण्यात आलेले आहेत. मात्र बहुतांश रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांना बेड मिळवण्यास अडचणी निर्माण होतात. हाच मुद्दा लक्षात घेवून आता बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे.
कोरोना बाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोेग्य योजनेतून उपचार मिळावेत तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्या रुग्णाचे समुपदेशन करण्याबरोबरच त्यांना या योजनेतंर्गत कोव्हिड उपचारासाठी अधिगृहित केलेल्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी म.फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक गायकवाड (मो.9595201858) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबरोबरच डॉ.संदीप आगलावे (मो.9420785578) व श्रीराम राठोड यांच्याकडे इतर कामे सोपवण्यात आली आहेत. ज्यात रुग्णालयात दाखल कोव्हिड रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. तसेच रुग्णांची माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी अद्यावत करुन घेणे, रुणालयाबाबत कोव्हिड रुग्णांच्या प्राप्त तक्रारींचे निरसन करणे, महात्मा फुले जनआरोेग्य योजनेतंर्गत लाभ घेतलेल कोव्हिड रुग्णांची माहिती सादर करणे आणि रुग्णालयात रुग्णांबाबतीत उपचाराच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश आणि महाराष्ट्र टास्क र्फोसचे 12 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन होत असल्याची खात्री करावयाची आहे. त्यामुळे आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोव्हिड उपचार घेणार्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Leave a comment