पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण
संपर्कातील लोकांनी चाचणी करण्याचे आवाहन
बीड । वार्ताहर
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना गुरुवारी (दि.29) सकाळी कोरोनाची लागण झाली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यासंबंधी ट्वीट करून त्यांनी स्वतः ही माहिती देत माझ्या समवेत असणार्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, काळजी घ्यावी.’ असे आवाहन केले. दरम्यान यानंतर सामाजिक न्याय मंत्री तथा पंकजा यांचे मोठे बंधू मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत पंकजा मुंडे यांना धीर दिला आहे. कोरोनाच्या त्रासाची मला जाणीव आहे, त्यामुळे मोठा भाऊ म्हणून मी नेहमी सोबत आहे, काळजी घ्या अशा शब्दात आधार दिला.
काही दिवसांपूर्वी पंकजा यांचा बॉडीगार्ड गोविंद मुंडे यांचे कोरोनाने निधन झाले. त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांना काही लक्षणे आढळली होती, मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती; मात्र तेव्हापासून त्या विलगीकरणात आहेत. त्यावेळीही धनंजय मुंडे यांनी डॉ. प्रीतम यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच मदतीचा हातही पुढे केला होता. असे असतानाच गुरुवारी सकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. ‘मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. मी अगोदरपासूनच विलगीकरणात आहे, कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौर्यात असणार्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, काळजी घ्यावी.’ असे आवाहन केले. त्यानंतर काही वेळेत सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘पंकजाताई, कोरोना विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय. यामुळे होणार्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बर्या व्हाल. काळजी घ्या ताई’ असे धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Leave a comment