शिरुरकासार । वार्ताहर
तालुक्याचे शहर असतानाही नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे सहा महिन्यांपासून पाणी शुद्धीकरण केंद्र बंद पडले आहे. सध्या दहा ते बारा दिवसाला शहरातील एका प्रभागात 45 मिनिटे जनतेला पाणी मिळते. नळांना आलेले हे पाणी दुर्गंधीयुक्त व गाळ मिश्रीत असते त्यामुळे लोक हे पाणी घेण्यास टाळाटाळ करतात. शहरातील जनतेला विकतच्या जारचे पाणी पिण्यासाठी घेण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. शहरातील जनतेचा विकतचे पाणी जार घेण्यासाठी महिन्याला जवळपास 12 लाखांचा दंड सोसावा लागत आहे.
शहरात छोटी-मोठी 1650 कुटुंब राहतात तर लोकसंख्या 15 हजार आहे. तसेच शहरात 13 पाणी शुद्धीकरण केंद्र आहेत. दररोज 2100 पाणी जारची जनतेला विक्री होते. त्यामुळे प्रतिदिन 40 हजार तर महिन्याला जवळपास 12 लाखांचा खर्च शहरातील जनतेला विकतचे पाणी जार घेण्यासाठी होत आहे. विकतचे पाणी घेऊन जनता बेजार झाली आहे. नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभाराकडे नगरसेवकांचेही दुर्लक्ष होत असून जनता मात्र पिण्याच्या पाणी घेऊन बेजार होत आहे. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाणी द्यायला मागणी वाढली आहे. जनतेला जार पाणी विकत घेण्यासाठी खर्च करावा लागत आहे. शिरुरकरांनी मोठ्या बहुमताने आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात ही नगरपंचायत दिली, परंतु नगरसेवक मात्र या गंभीर स्थितीत पिण्याच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आमदार सुरेश धस यांनी जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीचे आदेश नगरपंचायतला देवून शुद्ध पाणी नागरिकांना द्यावे अशी मागणी होत आहे.
Leave a comment