धरमकरांनी जबाबदारी स्विकारली;मात्र अडचणी कायम
बीड । वार्ताहर
कोरोना बाधितांसाठी प्रभावी ठरलेले रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांचे होत असलेले बेहाल आणि औषध प्रशासनाकडून होणारी टोलवाटोलवी लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकार्यांसमोर मांडल्यानंतर उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांच्याकडे रेमडेसिवीर वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर जिल्ह्यात एकूण उपलब्ध झालेले इंजेक्शन, त्याचे तालुकानिहाय होत असलेले वितरण याबाबतची निदान माहिती तरी माध्यमांपर्यंत उपलब्ध होवू लागली असून शुक्रवारी दिवसभरात 142 इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त झाले होते. त्याचे वितरणही संबंधितांना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली; मात्र मागणीच्या तुलनेत रेमडेसिवीरचा पुरवठा कमीच असल्याने अडचणी अजुनही कायम आहेत.
बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली फरफट माध्यमांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. गुरुवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांनी याच मुद्यावर जिल्हाधिकारी यांची भेट घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांकडून रेमडेसिवीर वितरणाचा बट्ट्याबोळ केला असल्याचे लक्षात आणून दिले होते. त्यानंतर एकूण उपलब्ध होणारे इंजेक्शन त्याचे करावयाचे वितरण याबाबत निर्णय घेण्यात येवून वितरणासाठी उपजिल्हाधिकारी धरमकर यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली. त्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यात किती रेमडेसीवरचा पुरवठा झाला याची माहितीही पहिल्यांदाच प्रशासनाकडून जारी झाली. इतके दिवस कोणालाच कशाचा ताळमेळ नव्हता. जिल्हा शल्य चिकित्सक असो की औषध प्रशासनाचे अधिकारी हे लोकांचे फोन घ्यायलाही तयार नव्हते.

शुक्रवारी उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी रेमडेसिवीर वितरणाची माहिती सादर केली. त्यानुसार जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन यांच्या पत्राप्रमाणे शुक्रवारी 120 रेमडीसिवर इंजेक्शनचा साठा तसेच लाईफलाईन रुग्णालय यांनी वाटपासाठी उपलब्ध करून दिलेला 22 असा एकूण 142 इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. यातील 94 इंजेक्शन बीड व अन्य तालुके तर 48 इंजेक्शन आष्टी तालुक्यास वाटप करण्यात आली. 120 प्राप्त इंजेक्शनपैकी 94 रुग्णास लागणारी दि. 22 रोजी आयटीआय बीड येथील कक्षास प्राप्त अर्जापैकी गुरुवारी इंजेक्शन मिळालेल्या अखेरच्या रूग्णापासून पुढचे 94 रुग्णास लागणारे इंजेक्शन संबंधित रुग्णालयास वितरित करण्यात आली असल्याची माहिती धरमकर यांनी दिली. तसेच खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन संबंधित औषधी एजन्सीकडून प्राप्त करून द्यावेत, यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना एजन्सीकडे पाठवायचे नाही अशा सूचनाही दिल्या आहेत.
सोशल डिस्टन्सचा फज्जा
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या कागदपत्रांची नोंदणी करण्याची पध्दत सुरु केली आहे. मात्र नाव नोंदणी करण्यासाठी बाधितांना ठेवलेल्या इमारतीच्या खाली रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांना रांगा लावण्याचे सांगीतले गेले आहे. महत्वाचे हे की या रांगेत सामाजिक अंतर पाळणे शक्य होत नाही असेच चित्र दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नावनोंदणीसाठी आयटीआयमध्ये दोनच व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या फॉर्मवरील माहिती लिहून घेता घेता सहाजिकच त्यांच्याही कामाची गती मंदावली आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment