जिल्हाधिकार्‍यांकडून नियोजन; सीएस यांचे संमतीपत्र अनिवार्य

बीड । वार्ताहर

कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी तीन दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाईकांची फरपट सुरु आहे. अखेर यात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तोडगा काढत मंगळवारी (दि.20) शहरातील दोन औषधी दुकाने निश्चित करुन तेथे रेमडेसिवीर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयाकडे नोंदणी केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना संमतीपत्र देऊन औषधी दुकानांवर पाठविण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात 17 ते 19 एप्रिल दरम्यान साडेचारशे रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनची नोंदणी केली होती.त्यांना मंगळवारपासून (दि.20) निश्चित केलेल्या दोन औषधी दुकानांतून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संमतीने इंजेक्शन घेण्यास सांगितले गेले. तत्पूर्वी जिल्हा प्रशिक्षण संस्थेत तीन टेबलवरुन इंजेक्शनबाबतचे संमतीपत्र रुग्णांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईक संबंधित औषधी दुकानांत पोहोचले.
जिल्ह्यात सध्या उपचाराधिन रुग्णांची संख्या पाच हजाराच्या घरात पोहोचली आहे. जिल्हा रुग्णालयासह शासकीय कोविड रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशी परिस्थिती हाताळताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठीही मारामार सुरु आहे. रुग्णांचे नातेवाईक दररोज आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेत इंजेक्शनसाठी हेलपाटे मारत आहेत.सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करुनही इंजेक्शन मिळणे कठीण बनले आहे. सोमवारी (दि.19) रुग्णांच्या नातेवाईकांच्या संयमाचा कडेलोट झाला. संतप्त नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ठिय्या देत इंजेक्शनची मागणी लावून धरली. त्यानंतरही त्यांची आश्वासनावरच बोळवण केली गेली. रात्री उशिरा काही जणांना इंजेक्शन मिळाले;परंतु मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने ही परिस्थिती हाताळणे आरोग्य विभागाला कठीण होऊन बसले. त्यामुळे मंगळवारी (दि.20) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी खासगी दवाखान्यांत उपचार घेणार्‍या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांचे अधिकार शाबूत ठेवले. मात्र, आता इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून नव्हे तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी संमतीपत्राद्वारे सुचविलेल्या औषधी दुकानांतून घ्यावे लागणार आहे.

तीन दिवसापासून इंजेक्शनची प्रतिक्षा

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने खासगी दवाखान्यांत उपचार घेणार्‍या रुग्णांना उसणवारीवर जिल्हा रुग्णालयातून इंजेक्शन देण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, उच्चांकी रुग्णसंख्येने इंजेक्शनची मागणी वाढत गेली, त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर ताण आला. 17 ते 19 एप्रिल दरम्यान रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनसाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्रात ताटकळले. मात्र, इंजेक्शन मिळालेच नाही. याचवेळी आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये इंजेक्शन पुरवठ्याच्या दाव्यांची चढाओढ लागली. प्रत्यक्षात इंजेक्शनचा तुटवडा कायम असताना केवळ आश्वासने देणार्‍या लोकप्रतिनिधींबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.