जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांचे व्यापार्यांना आवाहन
बीड । वार्ताहर
कोरोना बाधितांच्या दररोज वाढत जाणार्या संख्येमुळे जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता भासू लागली आहे.जिल्हा प्रशासनाकडे आणि आरोग्य प्रशासनाकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेली सिलेंडरची संख्या मर्यादित असल्याने बीड जिल्ह्यातील विविध औद्योगिक व्यापारी स्वरूपाच्या असलेल्या आस्थापनांकडे तसेच वैयक्तिक वापर असलेल्या खाजगी व्यक्तीकडे असलेले सिलेंडर (खासगी वापर म्हणजे ज्यांच्याकडे ऑक्सीजनचीच सिलेंडर असतात असा वापर होय) हे संबंधितांनी कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ जिल्हा प्रशासनाकडे द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी जगताप यांनी सांगीतले की, सध्या बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस गंभीर स्थिती धारण करत आहे.आज रोजी बीड जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय असून ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांना ऑक्सीजन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर संपूर्ण आरोग्य प्रशासन हे निकराने प्रयत्न करत आहे परंतु कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या, त्यांच्याकरिता उपलब्ध होणारा ऑक्सीजनचा पुरवठा, सातत्याने वाढणारी मागणी आणि ऑक्सीजन साठवून ठेवण्याच्या कमी असलेल्या सुविधा या सर्व बाबीमुळे अतितातडीच्या वेळी जर एखाद्या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठ्यामध्ये अडचण उद्भवली तर रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून राखीव साठा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखीव साठा असलेले ऑक्सीजन सिलेंडर भरून ठेवणे ही आजची महत्वाची गरज आहे. त्यामुळे विविध औद्योगिक व्यापार्यांनी सिलेंडर जिल्हा प्रशासनास द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
उपचारानंतर सिलेंडर संबंधितांना परत मिळणार
सदरील सिलेंडर प्रशासनाकडे ताब्यात घेताना त्याची पोहोच पावती संबंधितांना दिली जाईल व कोरोना रुग्णांच्या उपचाराचा कालावधी संपल्यानंतर सदरच ऑक्सीजन सिलेंडर संबंधितांना व्यवस्थित पद्धतीने परत करण्यात येतील.सध्या जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची अत्यंत तातडीची आवश्यकता म्हणून जिल्ह्यातील सर्व नागरिक,व्यापारी आणि उद्योजक यांनी आपले सिलेंडर जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाशी संपर्क करून तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत जाहीर आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे या अनुषंगाने संपर्क करिता तहसीलदार बीड शिरीष वमने यांना मोबाइल क्र. . 9960665222 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a comment