आ.संदीप क्षीरसागरांपुढे परिचारिकांनी वाचला समस्यांचा पाढा
बीड । वार्ताहर
कोरोना रुग्णांच्या गर्दीमुळे जिल्हा रुग्णालय खचाखच भरले आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणे स्वाभाविक आहे;परंतु लोकप्रतिनिधी म्हणून रुग्णालय प्रशासनाच्या पाठीशी असल्याची ग्वाही आ. संदीप क्षीरसागर यांनी दिली.व्यवस्थापनातील त्रुटी दूर होणे गरजेचे आहे,अशी अपेक्षा व्यक्त करुन रुग्णसेवेतील हलगर्जीपणा कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
आ. संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (दि.19) जिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन आंधळकर, डॉ.अशोक हुबेकर,मेट्रन संगीता दिंडकर, परिचारिका व आरोग्य कर्मचार्यांची उपस्थिती होती. आ.क्षीरसागर यांनी शनिवारी (दि.18) जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षाची पाहणी केली होती. यावेळी परिचारिकांनी त्यांच्यासमोर विविध अडचणी मांडल्या होत्या. याची सोडवणूक करण्यासाठी आ. क्षीरसागर यांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी कक्षातील स्वच्छतेकडे वॉर्डबॉय तसेच मुकादम यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप परिचारिकांनी केला. ही जबाबदारी पूर्णता: स्वच्छता कर्मचारी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्या मुकादमांची आहे;परंतु दोन-दोन दिवस कर्मचारी तिकडे फिरकत नसल्याचा आरोप परिचारिकांनी बैठकीत केला. मुकादमाने मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत वाढत्या कोविड वॉर्डमुळे कसरत होत असल्याचा खुलासा केला.त्यावर कंत्राटी स्वरुपात वॉर्डबॉय भरती करुन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या.वैद्यकीय अधिकारी-परिचारिकांना सर्व त्या सोयी-सुविधा पुरविल्या जातील;परंतु रुग्णसेवेत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करु नका, अशा सूचना आ. क्षीरसागर यांनी दिल्या. बैठकीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व मेट्रन संगीता दिंडकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी पाठपुरावा सुरु असून आतापर्यंत जिल्ह्यात किती इंजेक्शन आले व त्याचे वितरण कसे झाले, याचा अहवाल औषध निरीक्षकांकडून मागविणार आहे. त्यात काही गडबड आढळल्यास गय करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दाबदडप करणार्यांविरुध्द तक्रार द्या
जिल्हा रुग्णालयात आधीच अधिकारी, कर्मचार्यांवर ताण वाढला आहे. त्यात काही जण नाहक कर्मचार्यांना दाबदडप करत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा लोकांविरुध्द एकजुटीने उभे रहा, तक्रारी द्या, अशी सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी केली. कुठल्याही स्थितीत कर्मचार्यांचे मनोबल खच्ची होता कामा नये, त्यांच्याशी अरेरावी कदापि सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
सुरक्षा व्यवस्थापकास सुनावले
जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांचा मुक्तसंचार आहे. कोविड वॉर्डाच्या पाहणी दरम्यान काही नातेवाईक रुग्णांसोबत आढळल्याचे आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. यावरुन त्यांनी सुरक्षा व्यवस्थापकास भरबैठकीत धारेवर धरले. ’सुरक्षा रक्षक नेमकं काय करतात, रुग्णांच्या नातेवाईकांना आत कसे काय जाऊ दिले जाते?’ असा सवाल त्यांनी सुरक्षा व्यवस्थापकांना केला. यापुढे सुरक्षेत निष्काळजी केल्यास संबंधितास नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.
Leave a comment