जिल्हा रुग्णालयाचे अधिकार्यांसह औषध निरीक्षकाकडून नागरिकांची दिशाभूल
बीड । वार्ताहर
कोरोना बाधित रुग्णांसाठी सध्याच्या स्थितीत ‘अमृत’ ठरु लागलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा सध्या राज्यभरात प्रचंड तुटवडा असून केवळ वेळेवर इंजेक्शन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवण्याची वेळ येवू लागली आहे. दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री असो की इतर लोकप्रतिनिधी अथवा जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक अन् प्रशासनाने स्थापन केलेला नियंत्रण कक्ष हे सारे कोरोना रुग्णांना मदत तर सोडाच त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची क्रुर चेष्ठा करु लागल्याचे चित्र बीडमध्ये पहावयास मिळत आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय जिल्ह्यासाठी चने-फुटाणे वाटल्याप्रमाणे 10 हजार रेमडेसीवीर उपलब्ध करणार असल्याचे सांगतात, त्याही पुढे जावून जिल्हा रुग्णालयाला त्यांच्या नाथ प्रतिष्ठानकडून 250 इंजेक्शन शनिवारी (दि.17) रात्रीच उपलब्ध केल्याचे पत्रकातून सांगत आहेत.इतकेच नाही तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी इंजेक्शन मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानल्याचेही कौतूक केले जाते. ही सारी शबासकीची थाप ठीक; पण बीडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांसाठी एक-एक इंजेक्शन मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना अनेक मेडिकल पायदळी तुडवावे लागत आहेत, दररोज बीड सिव्हीलच्या टे्रनिंग सेंटरला सीएस डॉ.गित्तेंची सही घेण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. इतके सारे करुनही वेळेत इंजेक्शन मिळेलच याची हमी जिल्हा रुग्णालय प्रशासन सोडा, बीडचे जिल्हाधिकारी सुध्दा देवू शकत नाहीत असे वास्तव बीडमध्ये दररोज पहायला मिळत आहे.
संकटकाळात एखाद्या इंजेक्शनचा काळाबाजार व्हावा, चढ्या भावाने विक्री व्हावी अन् रुग्णांच्या नातेवाईकांनी डोळ्यातून अश्रू ढाळावेत तरीही त्यांची परवड थांबत नाही असेच काहीसे भीषण चित्र बीडमध्ये निर्माण झाले आहे. रुग्णाचे नातेवाईक आपल्या परीने जे-जे शक्य होईल तितके सारे प्रयत्न करुन, ओळखीच्या मित्रांना, अधिकार्यांना,नेत्यांना फोन करुन थकून जात आहेत, रांगा लावत आहेत, मात्र इंजेक्शन वेळेत त्यांच्या पदतरात पडेलच याची हमी आता कोणालाही देता येत नाही. शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे 164 इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी नावनोंदणी केली होती, त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रेही दाखल केले, मात्र त्यांना इंजेक्शन मिळालेच नाही. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करत अधिकार्यांचे मोबाइल नंबर तसेच हेल्पलाईनचा नंबर जनतेसाठी उपलब्ध करुन दिला. मात्र ही अपेक्षाही फोल ठरली आहे. सर्वसामान्य, अडल्या-नडलेल्या लोकांचे फोन कॉलही या नियंत्रण कक्षातून स्विकारले जात नाहीत. फोन घेतलाच तरी वरिष्ठ अधिकार्यांचा नंबर देवून त्यांच्याशी इंजेक्शनसाठी बोला, असे उत्तर देवून रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट कायम ठेवली जात आहे. अर्थात काही जणांना इंजेक्शन मिळालेही, पण आता ती स्थिती बदलली आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती भीषण बनत चालली आहे. दररोज एक हजाराहून अधिकचे रुग्ण निष्पन्न होत आहेत. शिवाय मृत्यूदरही वाढला आहे. अशा स्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळेना महत्वाचे आहे, मात्र बीडमध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाकडून ज्या पध्दतीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला पाहिजे, मात्र रुग्णालय प्रशासन यात अपयशी ठरत आहे. रुग्ण मरणयातना सहन करत असताना लोकप्रतिनिधींकडून रेमडेसीवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्यक्षात एकही इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत चालले असून अधिकार्यांवर कुणाचाच अंकुश राहिलेला दिसत नाही, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
हेल्पलाईनच हेल्पलेस!
मोठ्या थाटामाटात प्रशासनाने हेल्पलाईन सेंटर सुरु केले. सदरील हेल्पलाईनसाठी जो मोबाइल क्रमांक दिला आहे, त्यावर संपर्क साधला असता ते केवळ औषध निरीक्षक डोईफोडेंना बोला, एवढेच उत्तर देतात. या हेल्पलाईनमधून कसलीही माहिती मिळत नाही.रेमडेसीवीर किती आले? हे देखील त्यांना माहित नाही. त्यामुळे प्रशासनाने सुरु केलेले हेल्पलाईन सेंटरच हेल्पलेस ठरले आहे.
डोईफोडे फोन तरी उचला
औषध निरीक्षक डोईफोडे यांच्या बेजबाबदारपणामुळेच गेल्या दोन आठवड्यात रेमडेसीवीरच्या नियोजनाचा बट्ट्याबोल झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांना लक्ष घालावे लागले. मात्र त्यानंतरही काही फरक पडलेला नाही.हेल्पलाईन सेंटरवरुन डोईफोडेंना बोला असे सांगीतले, पण फोनच घ्यायचा नाही असे ठरवलेल्या डोईफोडेंना संपर्क तरी कसा करायचा. निदान फोन उचलायची तरी सहानभूती डोईफोडेंनी नागरिकांना दाखवावी.अन्यथा बीडकर झटका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
नाथ प्रतिष्ठानचे रेमडेसीवीर आलेच नाही
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा करत दहा हजार इंजेक्शन उपलब्ध करुन देवू असे सांगीतले. ते यायचे तेव्हा येतील पण काल शनिवारी सायंकाळी पुन्हा मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानकडून जिल्हा रुग्णालयाला आधार देत 250 रेमडेसीवीर उपलब्ध करुन दिले आणि हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रशासनानेही आभार मानले अशी दिशाभूल करणारी बातमी प्रसारमाध्यमांकडे पाठवली. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गित्ते यांना विचारणा केली असता रात्री 10 वाजेपर्यंत हे इंजेक्शन आलेच नव्हते. मग जनतेची दिशाभूल कशासाठी? पालकमंत्र्यांनी निदान खोटी माहिती देवून संभ्रम निर्माण करु नये अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
संदीप भैय्या आढावा नको,रेमडेसीवीर द्या
आ.संदीप क्षीरसागर यांनी काल जिल्हा रुग्णालय आणि कोव्हीड सेंटरला भेट देवून तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. व्यवस्थाच नाही, असे रुग्ण बोंबलत आहेत. दररोज जिल्हाधिकार्यांकडे आणि प्रसारमाध्यमांकडे तक्रारी येत आहेत. आ.क्षीरसागरांनी आढावा तरी कशाचा घेतला, त्यामुळे आढावा घेण्यापेक्षा जिल्ह्यात त्यातही बीड शहरातील रुग्णांलयामध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध कसे होईल यासाठी प्रयत्न करा अशी अपेक्षाही जनतेमधून व्यक्त केली जात आहे.
Leave a comment