केवळ 12 डॉक्टरांकडून 500 रुग्णांवर उपचार
बीड । वार्ताहर
जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई आणि बीड हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. गतवर्षीच्या कोरोना लाटेत अंबाजोगाईने कोरोनाला चांगल्यापैकी रोखले होते. मात्र दुसर्या लाटेने अंबाजोगाईलाच घायाळ केले आहे. विशेषत: अंबाजोगाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील 500 खाटांचे अद्ययावत रुग्णालय असूनही रुग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. वेळेवर उपचार न भेटणे, ऑक्सीजन न भेटणे, इतर सुविधा न मिळणे आदी तक्रारी रुग्णांकडून आणि नातेवाईकांकडून केल्या जावू लागल्या आहेत. स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असले तरी रुग्णसंख्येवर त्यांना अजूनही नियंत्रण मिळवता आलेले नाही.केवळ आरोग्य प्रशासनाने रुग्णसंख्या नियंत्रणात येईल असे नाही तर अंबाजोगाई येथील महसूल, पोलीस आणि नगरपालिका यांनीदेखील याकामी लक्ष घालणे गरजेचे आहे. या तीनही यंत्रणेला जिल्हाधिकारी जगताप यांनी कामाला लावावे अशी मागणी अंबाजोेगाईतील नागरिक करु लागले आहेत.
बीड जिल्ह्यात मागच्या मे महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली. जिल्हा रुग्णालयात जागा कमी पडू लागल्यानंतर आणि अंबाजोगाईचे एसआरटी फुल झाल्यानंतर तातडीने तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर सुरू केले. गेल्या दहा महिन्यात या ठिकाणी असलेल्या दोन इमारतीमध्ये हे सेंटर सुरु आहे. वर्षभराचा अनुभव गाठीशी असल्यानंतर आरोग्य विभाग विशेषतः जिल्हा रुग्णालय प्रशासन प्रशासन गतीने कामाला लागले असेल असे वाटत होते,मात्र डॉ. थोरात यांच्या जागी आलेले डॉ सूर्यकांत गित्ते यांनी अद्यापही ना जिल्हा रुग्णालयात लक्ष दिले आहे ना लोखंडी सावरगावकडे लक्ष दिले आहे. लोखंडी येथे तब्बल सातशे बेड उपलब्ध असून आजच्या काळात यातील साडेपाचशेपेक्षा अधिक बेड फुल आहेत. दररोज अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत आहेत.अंबाजोगाईचे एसआरटी रुग्णालय फुल झाल्याने रुग्णांना लोखंडी येथे दाखल केले जाते.या ठिकाणी शंभर रुग्णांसाठी 8 डॉक्टर असणे आवश्यक आहे मागच्या काळात होते देखील.त्याचसोबत 17 स्टाफ नर्स,8 वार्ड बॉय होते,मात्र आज पाचशे पेक्षा जास्त रिग्न असताना केवळ 12 एमबीबीएस डॉक्टर,24 स्टाफ नर्स आणि 20 वार्ड बॉय उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे एकही एमएस किंवा एमडी डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीत. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात देखील सर्व व्यवस्था आहे. तेथील सीटीस्कॅन मशीन मध्यंतरी दोन दिवस बंद होती. विशेष म्हणजे याच महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळाही आहे. गेल्या वर्षभरात या प्रयोगशाळेने महत्वाचे काम केलेले आहे. दुसरीकडे लोखंडी सावरगावात अद्ययावत इमारत आहे. मात्र या ठिकाणी सिटीस्कॅन मशीन किंवा पुरेसे व्हेंटिलेटर बेड नाहीत. बाकीच्या सुविधा तर दूरच पण या ठिकाणी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज होऊन आठवडा झाला तरी नगर पालिकेला लिकेज सापडलेले नाही.त्यामुळे या ठिकाणी दररोज किमान आठ टँकर पाणी लागते मात्र केवळ चार टँकर उपलब्ध होत असल्याने रुग्ण अन् डॉक्टर, स्टाफ यांना कसेतरी भागवावे लागत आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोट्यवधी रुपयांचा निधी आणत असताना डॉ. गित्ते सारख्या अधिकार्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे रुग्णांचे अन् स्टाफचे मात्र हाल होत आहेत.या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट देखील उभारला गेला आहे मात्र लिक्विड ऑक्सिजन टँकर उपलब्ध नसल्याने हा प्लांट सुरू होऊ शकलेला नाही. सिटीस्कॅन करण्यासाठी थेट चार किमी रुग्ण घेऊन एसआरटी गाठावे लागते,या ठिकाणची मशीन कधी सुरु असते तर कधी बंद आहे. तेथील रुग्णसंख्या दररोज किमान तीस चाळीस असल्याने लोखंडी च्या रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. एकंदरीतच इन्फ्रास्ट्रक्चर असूनही केवळ नियोजन नसल्याने आणि आरोग्य प्रशासनाला इतर यंत्रणांची मदत होत नसल्याने अंबाजोगाईत कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मरणयातना भोगत आहेत.
बीड जिल्हा रुग्णालयात सफाई कामगार आहेत का?
जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार योग्य मिळतात. गेल्या वर्षभरात अनेकांना जीवदान मिळाले. डॉ.अशोक थोरात असतानाही जिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात का होईना शिस्त होती.मात्र आता रुग्णालयातील बहुतेक जुने कर्मचारी तिकडे आदित्यकडे वर्ग झाले आहेत. नव्याने भरती झालेल्या कर्मचार्यांवरच जिल्हा रुग्णालयाची मदार आहे. या रुग्णालयात गेल्यानंतर एवढ्या मोठ्या जिल्हा रुग्णालयात सफाई कामगार आहेत की नाही असा प्रश्न पडतो. कोरोना वार्डच काय, पण इतर वार्डात आणि रुग्णालयाच्या परिसरात सर्वत्र घाणच घाण आहे. लोक वापर व्यवस्थित करत नाहीत, सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत हे जरी खरे असले तरी रुग्णालय प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही? असा प्रश्न नक्कीच पडतो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी चार महिन्यापूर्वी कारभार हाती घेतला; मात्र नव्याने त्यांनी काही केले नाही. रुग्णालयाच्या प्रशासनावर त्यांची पकड असूनही बसलेली नाही,त्यामुळे कर्मचार्यांतील मनमानी वाढली आहे हे देखील त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
रेमडेसिवर नाही,लसीकरण बंद,जिल्हा रुग्णालयही हाऊसफूल
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांनाच जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून रेमडिसेव्हरची टंचाई भासत असून अनेक रुग्णांनी मोठ्या शहरातील रुग्णालयात जाणे पसंत केले आहेे. त्याच बरोबर लसीचा साठा संपल्याने लसीकरणही बंद आहे. रुग्ण वाढल्याने खासगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात देखील रुग्णांना ठेवायला एकही बेड शिल्लक नाही.जिल्हा रुग्णालय हाऊसफूल झाले आहेे. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हॅटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.दरम्यान या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हाधिकारी जगताप आणि जिल्हा शल्यचिकित्सक गित्ते यांनी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.
रेमडेसीवीरची दुकानदारी थांबणार रुग्णालयातच मिळणार इंजेक्शन
सध्या राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच या रुग्णांच्या उपचारासाठी लागणार्या रेमडेसीवीर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. साठेबाजी करुन कृतिम तुटवडा निर्माण केल्याचे प्रकार अनेक ठिकाणी पुढे आली असून मुंबईत काही जणांना पोलीसांनी गजाआडही केले आहे. दरम्यान केवळ 1500 रुपये किमंत असलेले हे इंजेक्शन चढ्या दराने विक्री केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर यापुढे रेमडेसीवीर इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे साठेबाजी थांबून कृतिम तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. या आदेशानुसार रेमडेसीवीर इंजेक्शन रुग्णालयांनी पुरवायची आहेत, ही औषधे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून आणायला लावू नयेत असे या आदेशात स्पष्ट शब्दांत नमूद केलेले आहे. या आदेशानुसार आता रेमडेसीवीरची मागणी करताना रुग्णालयातील रुग्णसंख्या विचारात घ ेवून व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडेसीवीरची गरज आहे, अशी संख्या विचारात घेवून तीन दिवस पुरेल इतक्या इंजेक्शन साठ्याची मागणी नोंदवावी असे म्हटले आहे. तसेच घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सीअॅन्डएज्ञ एजंट यांनी रुग्णांच्या कागदपत्रांची योग्य शहनिशा केल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा असे म्हटले आहे.
Leave a comment