कठोर निर्बंधांच्या नावाखाली व्यवसायांना टाळे!

 

लोकप्रश्‍नचे दुरध्वनी खणाणले

काल संध्या.७ वाजता जिल्हाधिकार्‍यांनी अध्यादेश काढल्यानंतर वाचकांना सर्व प्रथम माहिती देण्याच्या हेतूने लोकप्रश्‍नच्या लाइव्ह पोर्टलवर ही बातमी सर्वप्रथम टाकण्यात आली. जिल्हाभरात सर्व तालुका आणि गावागावात सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे वृत्त धडकल्यानंतर लोकप्रश्‍नचे सर्वच दूरध्वनी खणाणले. जवळपास 3 तास मोबाईलवर व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, नागरीक नव्या अध्यादेशाची खात्री करुन घेत होते.

 

 

 बीड | वार्ताहर

 

राज्यसरकारने रविवारी राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी ब्रेक टू चैन या मोहीमेखाली तोडण्यासाठी निर्बंध आणि लॉकडाऊनची नियमावली जाहीर केल्यानंतर राज्यभरात संभ्रम निर्माण झाला. केवळ शनिवारी आणि रविवारी बंद इतर दिवशी सगळे काही चालू असाच समज राज्यातील आणि जिल्ह्यातील जनतेने करुन घेतला होता. ४ एप्रिलपर्यंत बीड जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी मिनी लॉकडाऊन लावले होते. पुन्हा सायंकाळी ७ वाजता राज्य सरकारने रविवारी काढलेले आदेश जिल्ह्यातही लागू केले असून निर्बंधाच्या नावाखाली पुर्ण लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीच सुरु झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिल पर्यंत सर्व व्यवसाय, दुकाने बंद राहणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी वर्ग, लहान मोठे दुकानदार, हॉटेलचालक, सलून व इतर व्यावसायीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सोमवारी (दि.५) नव्याने आदेश जारी करत जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. सोबतच ३० एप्रिलपर्यंत काही निर्बंध व मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार आता ३० एपिलपर्यंत जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनसारखी परिस्थिती असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीही राहणार आहे. अर्थात रविवारी राज्य शासनाने जे निर्बंध जारी केले आहेत, त्या प्रमाणेच जिल्हा प्रशासनाने सोमवारी सायंकाळी हे आदेश जारी केले आहेत.

सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येता येणार नाही. हा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यावर येता येणार नाही.त्यामुळे दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे चित्र राहणार आहे. तसेच १०, ११, १७,१८,२४,२५ एप्रिल (शनिवार व रविवार) रोजी वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना पूर्णत: बंद राहतील. नव्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्याचा आकडा वाढलेलाच ४७ हजार २८८ रुग्ण

 राज्यात करोनाचा संसर्गाचा उद्रेक पाहायाल मिळत आहे. दिवसेंदिवस करनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन करनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील दररोज करोनाबाधित मोठ्यासंख्येने आढळतच आहेत. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ क्टिव्ह रुग्ण आहेत. 

लसीकरण आणि चाचणी केल्यास परवानगी मिळणार

जी आस्थापने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत त्या आस्थापनामधील म्हणजेच दुकाने, खाजगी कार्यालये व इतर संस्था यांच्यामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आणि व्यावसायीकांनी लसीकरण करुन कोरोना चाचणी केली तर प्रशासन अशी बंद असलेली दुकाने चालू करण्यास परवानगी देवू शकते असेही अध्यादेशात म्हटले आहे.

आजपासून हे सुरु 

अत्यावश्यक सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली असून रुग्णालये, रोग निदान केंद्रे,वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, वैद्यकीय व आरोग्य सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बसेस.मान्सूनपूर्व उपक्रम व सेवा, स्थानिक प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणार्‍या सर्व सेवा, मालाची/वस्तूंची वाहतूक, शेतीसंबंधी सेवा, वृत्तपत्र कार्यालये, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणार्‍या अत्यावश्यक सेवा. खासगी वाहने तसेच खासगी बससेवा सोमवार ते शुक्रवर सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत सुरु राहतील. खासगी वाहने तसेच खासगी बससेवा सोमवार ते शुक्रवार रात्री आठ ते सकाळी सात आणि शुक्रवार रात्री आठ ते सोमवार सकाळी सात या वेळेत तातडीच्या व अत्यावश्यक कारणांसाठी सुरु ठेवता येतील.

आजपासून हे बंद 

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, मॉल्स पूर्ण दिवस बंद राहतील.अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानांमध्ये सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर बंधनकारक असेल.सहकारी, सार्वजनिक व खासगी बँका, विद्युत पुरवठा संबंधित कार्यालये वगळता इतर खासगी कार्यालये बंद राहतील. सिनेमागृहे, नाट्यगृहे, पार्क, जलतरण तलव, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर बंद राहतील. धार्मिक स्थळे, मंदिरे तसेच प्रार्थना स्थळेही बंद राहतील. सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहतील. मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षार्थ्यांना सूट असेल. सर्वकोचिंग क्लासेस बंद असतील.धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केवळ पार्सल सेवा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत द्यावी, बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची सोय असणार्‍या व्यवसायांनाच परवानगी असेल. तेथे कामगार व साधन सामुग्री वाहतुकीला परवानगी राहणार नाही.

दहा खासगी रुग्णालयातील ७२ खाटा कोरोनासाठी आरक्षित

बीड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरातील दहा रुग्णालयांमधील खाटा आरक्षणाचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. यात विठाई हॉस्पिटल (१० ),  वीर हॉस्पिटल (९) , घोळवे हॉस्पिटल (५ ), स्पंदन हॉस्पिटल (८ ) लाइफ लाइन हॉस्पिटल ( ८ ), यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल (७ ) तिडके हॉस्पिटल (७), प्रशांत हॉस्पिटल (६), मातोश्री हॉस्पिटल (६), शुभदा हॉस्पिटल ( ६ ) अशा ७२ खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून राखीव खाटांवर कोरोना रुग्णांना उपचार द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी काढले आहेत. 

 

लसीकरण आणि चाचणी केल्यास परवानगी मिळणार

जी आस्थापने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत त्या आस्थापनामधील म्हणजेच दुकाने, खाजगी कार्यालये व इतर संस्था यांच्यामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आणि व्यावसायीकांनी लसीकरण करुन कोरोना चाचणी केली तर प्रशासन अशी बंद असलेली दुकाने चालू करण्यास परवानगी देवू शकते असेही अध्यादेशात म्हटले आहे.

सोमवारी ५७५ रुग्ण आढळले

 बीड,अंबाजोगाई शहर कोरोनाचे हॉटस्पॉट

जिल्ह्यात सोमवारी (दि.५) कोरोनाचे तब्बल ५७५ नवे रुग्ण निष्पन्न झाले. तसेच २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान लॉकडाऊन हटवताच बाधितांच्या रुग्णामध्ये विक्रमी वाढ झाली. बीड तालुक्यासह अंबाजोगाई शहर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले असून आष्टी, केज आणि परळी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली आहे.
रविवारी दिवसभरात जिल्ह्यात २ हजार २५५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल  सोमवारी प्राप्त झाले. यापैकी १ हजार ६८० अहवाल निगेटिव्ह आले तर तब्बल ५७५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात बीड तालुक्यात सर्वाधिक १५०, अंबाजोगाई १२७, आष्टी ८०, धारुर ११, गेवराई १८, केज ५०, माजलगाव ३५, परळी ४८, पाटोदा २९, शिरुर २४ आणि वडवणी तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. तसेच २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान सोमवारी आणखी तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात गवळवाडी (ता.बीड) येथील ७० वर्षीय पुरूष, कुर्ला (ता.बीड) 
येथील ५५ वर्षीय पुरूष आणि बीड शहरातील तेली गल्लीतील ६७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या २७ हजार ७७५ इतकी झाली आहे. पैकी २४ हजार ९४२ कोरोनामुक्त झाले असून ६६२ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, साथरोग अधिकारी पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.