जिल्ह्यात 393 रुग्ण;258 कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि.1) आणखी सहा मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. तर गुरुवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाचे 393 नवे रुग्ण निष्पन्न झाले. याशिवाय 258 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. संपुर्ण जिल्हा लॉकडाऊन असतांनाही बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे.
बुधवारी जिल्ह्यात 2 हजार 956 जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यामध्ये 393 नवे रुग्ण आढळून आले तर 2 हजार 563 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 127, अंबाजोगाई 65, आष्टी 45, धारुर 4, गेवराई 11, केज 33, माजलगाव 34, परळी 34, पाटोदा 26, शिरुर 5 तर वडवणी तालुक्यातील 9 जणांचा समावेश आहे. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात अजमेरनगर, बीड येथील 77 वर्षीय पुरुष व इंद्रप्रस्थनगर, बीड येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय पूर्वीच्या चार मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली.आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 897 इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 23 हजार 502 इतकी आहे तर 641 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
डॉक्टर-परिचारकांना मिळणार नवे पीपीई कीट
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांसह परिचारिकांसाठी यापूर्वी उपलब्ध करुन दिलेले पीपीई कीट (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) खराब झालेले आहेत. त्यामुळे डॉक्टर,परिचारिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला होता. यावेळी डॉक्टर-परिचारिकांनी पीपीई कीटचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आता नव्याने पीपीई कीटची मागणी करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात हे कीट उपलब्ध होतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी दिली.
रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा रुग्णालयात 96 खाटा वाढवल्या
जिल्हा रुग्णालयात दाखल होणार्या नव्या कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसापासून वाढतच चालली आहे. जिल्हा रुग्णालयातील सर्व इमारतींमध्ये मिळून 320 खाटा उपलब्ध आहेत. सध्या या सर्वच खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. त्यामुळे नव्याने दाखल होणार्या रुग्णांसाठी आणखी 96 खाटा वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाची एकूण खाटांची क्षमता 320 इतकी आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच बीड शहर व तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज तीनशेहून अधिक रुग्ण बाधित निष्पन्न होत आहेत. यातील निम्मे रुग्ण केवळ बीड तालुक्यातील असतात. गुरुवारीही जिल्ह्यात 393 रुग्ण वाढले. यातील 127 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत. नव्या रुग्णांच्या तुलनेत सहवासीतांचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेवून अधिकाधिक खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उपाययोजना म्हणून रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयातील नेत्रविभाग, नवजात शिशू अतिदक्षता कक्ष, जुना सिझर वार्ड आणि बर्न वार्ड कोरोना बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध करुन देण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु रुग्ण वाढू लागल्याने गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात 96 खाटा वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा रुग्णालयातील एकूण खाटांची क्षमता 416 झाली आहे.
खाटा वाढवून उपचार करणार-डॉ.गित्ते
जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग, एनआरसी व बर्न वार्डची इमारतही कोरोना रुग्णांसाठी लवकरच हस्तांतरीत करण्याचे नियोजन केले गेले आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या 284 ऑक्सीजन खाटा असून 48 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध आहेत. आणखी खाटा वाढवण्याचे नियोजन सुरु आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी दिली.
सुरक्षारक्षकांना न जुमानता नातेवाईक कोरोना वार्डात!
जिल्हा रुग्णालयाची शिस्त बिघडली
नातेवाईकच ठरु लागले सुपर स्प्रेडर
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा समुह संसर्ग वाढत असतानाच बाधीत निष्पन्न होणार्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या नियमांना फाटा देत, सुरक्षा रक्षकांना न जुमानता वार्डात जावून बाधित रुग्णांशी चर्चा करण्यापर्यंत मजल मारली आहे. अनेकदा सांगूनही हे लोक ऐकायला तयार होत नसल्याचे आता जिल्हा रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून रुग्णालयाची शिस्त बिघडत चाचली आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या 320 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. रुग्णांच्या जेवणाची सोयही रुग्णालयाकडून करण्यात आलेली आहे. तसेच रुग्णांचे नातेवाईक त्यांना घरचा डब्बा घेवून येतात. तो डब्बा रुग्णालय परिसरात दिल्यास वार्डापर्यंत पोहचवला जातो. मात्र काही जण थेट रुग्णाला भेटण्यासाठी वार्डात जाण्याचा धोका पत्करत आहेत. वास्तविक बाधित रुग्णांना वार्डात जावून भेटल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा रक्षक तसेच पोलीस बंदोबस्तही तैनात केलेला आहे. परंतु त्यांची नजर चुकवून काही नातेवाईक थेट वार्डात जावून बेडवर बसून रुग्णाशी चर्चा करत असल्याचे आढळून आले आहे. कर्तव्य बजावणार्या डॉक्टर, परिचारिकांनी हे चूकीचे असल्याचे संबंधितांना सांगूनही ते लोक ऐकायला तयार नसतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नातेवाईकच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वाढत आहे.
नातेवाईकांनी स्वत:ची काळजी घ्यावी
बाधित रुग्णांवर डॉक्टर,परिचारिकांचा निगराणीखाली उपचार सुरु असतात. रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी आरोग्य विभाग काम करत आहे. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण वार्डात जावून त्यांना भेटण्याचा हट्ट करु नये. ही स्थिती केवळ जिल्हा रुग्णालयातच आहे. आरोग्य कर्मचारी,सुरक्षा रक्षकांनी सांगूनही काही जण ऐकत नाहीत, पण यातून कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नातेवाईकांनी स्वत:च्या आरोग्य काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी केले आहे.
Leave a comment