45 वर्षांपूढील सर्वांना मिळणार लस
बीड । वार्ताहर
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्ह्यात 16 जानेवारीपासून सुरुवात झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, साठ वर्षांवरील जेष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांपूढील सह व्याधीग्रस्तांना ही लस टोचवण्यात आली. त्यानंतर 1 एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली असून या टप्प्यात 45 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.1) सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम यांनी दिली.
जिल्ह्यात या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर 45 वर्षांपुढील नागरिकांची संख्या लक्षात घेवून अधिकच्या लशींचा साठा उपलब्ध करुन घेतला जात आहे. 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची जिल्ह्यातील संख्या 9 लाख 10 हजार 592 इतकी आहे. आता आरोग्य विभागाकडून दररोज किमान 10 हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले जात आहे. यासाठी 1 लाख लशीच्या डोसची मागणी करण्यात आली आहे. टप्प्या टप्याने ही लस आरोग्य विभागाला मिळणार आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालय त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली गेली आहे. जिल्ह्यातील 54 उपकेंद्रातही डोस उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठीचे नियोजन करण्यासाठी आरोग्य पथके सज्ज झाली आहे.
नागरिकांनी लस घ्यावी-डॉ.राठोड
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. सर्वांना वेळेत लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना लसीकरणाची नोंदणी ऑनलाईनही करण्याची सुविधा देण्यात आली आहे.नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी केले आहे.
Leave a comment