बीड | वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग सुरुच आहे. आज बुधवारी (दि.31) जिल्ह्यात नव्याने 325 कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे. दरम्यान मागील दोन दिवसात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. दररोज तीनशेहून अधिक रुग्ण आढळत असल्याने कोरोनाची स्थिती बिकट बनत चालली आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच मृत्यूदरही वाढल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नागरिकांनी वेळोवेळी कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात नव्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 2 हजार 231 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यात 1 हजार 906 अहवाल निगेटिव्ह आले तर 325 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई तालुक्यातील 50 , आष्टी 34, बीड 98, धारूर 4, गेवराई 21, केज 21, माजलगाव 20, परळी 41, पाटोदा 24, शिरुर 7 आणि वडवणी तालुक्यातील 5 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान सोमवार (दि.29) व मंगळवारी (दि.30) जिल्ह्यात 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात सोमवारी तळेगाव (ता.परळी) येथील 55 वर्षीय महिला, कडा (ता.आष्टी) येथील 65 वर्षीय पुरुष, यशवंतनगर,बीड येथील 65 वर्षीय पुरुष व आदर्शनगर बीड येथील 79 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मंगळवारी एक मृत्यूची नोंद झाली. यात सहयोगनगर बीड येथील 86 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 504 एवढी झाली आहे. पैकी 22 हजार 887 कोरोनामुक्त झाले असून 626 जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Leave a comment