जिल्ह्यात एक दिवसात 266 बाधित रुग्ण वाढले
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोना समुह संसर्गाची दुसरी लाट आल्यासारखी स्थिती आता निर्माण होत आहे. बुधवारी (दि.17) जिल्ह्यात तब्बल 266 नवे बाधित रुग्ण निष्पन्न झाले. तसेच मंगळवारी (दि.16) दोघांचा मृत्यू झाला तर 80 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. सोमवारी जिल्ह्यात आरटीपीसीआर तसेच व्यापारी आणि जिल्हा कारागृहातील कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. त्यामुळे बाधितांचा आकडा तेट पावणेतीनशेच्या पुढे सरकला आहे. मंगळवारी जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात सुकळी (ता.धारुर) येथील 40 वर्षीय महिला व समनापूर (ता.बीड) येथील 49 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील 2 हजार 363 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 2 हजार 97 अहवाल निगेटिव्ह आले तर 266 पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 100 रूग्ण आढळले. त्यापाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात 60, आष्टी 9 , गेवराई 18, केज 8 , धारूर 4, माजलगाव 35, परळी 15, शिरूर 4 आणि वडवणी तालुक्यातील 4 रुग्णाचा समावेश आहे. तसेच मंगळवारी 80 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 21 हजार 224 इतका झाला असून 19 हजार 306 जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यातील 595 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 2 लाख 36 हजार 7 संशयितांची चाचणी झाली आहे, यातील 2 लाख 14 हजार 783 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान रुग्णसंख्या वाढत असली तरी आता जिल्ह्याचा मृत्यूदर कमी होतांना दिसत आहे. गत महिन्यात जिल्ह्याचा मृत्यूदर 3.7 टक्के इतका होता आता तो 2.83 टक्के इतका झाला आहे.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली. कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढू लागल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे होऊन बसले आहे.
19 ठिकाणी कोव्हीड रुग्णांवर उपचार
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून आरोग्य विभागाकडून खाटांची संख्या वाढवली जात आहे. तूर्तास जिल्ह्यात 19 ठिकाणी कोव्हीड हॉस्पीटल व कोव्हीड केअर सेंटरमध्ये 1 हजार 57 रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णालयात 2 हजार 113 खाटा उपलब्ध करुन दिल्या असल्या तरी सध्या केवळ 1 हजार 413 खाटा आहेत. उपचार घेणार्या रुग्णांव्यतिरिक्त 436 खाटा शिल्लक आहेत.आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
Leave a comment