तांत्रिक अडचणीमुळे सहा केंद्रांवर लसीकरण झालेच नाही
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात सोमवारपासून (दि.1) साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास जिल्ह्यातील 11 केंद्रांवरुन सुरुवात झाली. मात्र सॉफ्टवेअरच्या तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणात व्यत्यय आला. दिवसअखेर पाच केंद्रांवरुन जेमतेम 79 जणांना लस टोचण्यात आली. उर्वरित सहा केंद्रांवर एकालाही लस मिळू शकली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा हिरमोड झाला.
जिल्ह्यात 11 केंद्रांवरुन 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची मोहीम आरोग्य प्रशासनाने हाती घेतली आहे. 11 केंद्रांवर प्रत्येकी शंभर या प्रमाणे दररोज 1100 ज्येष्ठ नागरिकांना लस मिळणे अपेक्षित आहे. सरकारी केंद्रांवर मोफत लस असून खासगी रुग्णालयांत 250 रुपये मोजावे लागणार आहेत. जिल्ह्यात तब्बल 20 खासगी हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत साठ वर्षांपुढील व्यक्तींची संख्या तीन लाख इतकी अपेक्षित आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे. मात्र, सोमवारी (दि.1) पहिल्या दिवशी अंबाजोगाई, गेवराई, आष्टी, धारुर, शिरुर व वडवणी येथे एकालाही लस मिळू शकली नाही. संकेतस्थळावर रुग्णांची माहिती अपलोड करण्यासाठीचा डाटाच दिसत नव्हता. ऑफलाइन लसीकरणाला अद्याप परवानगी नाही. तांत्रिक अडचणीमुळे ज्येष्ठांचा हेलपाटा झाला.
प्रशासनाने केंद्रांवर योग्य ती तयारी केलेली होती. परंतु संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे पहिल्या दिवशी उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण मोहीम सुरळीत होईल. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे अशी प्रतिक्रिया नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम यांनी दिली.दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करावयाची आहे.यासोबतच ऐनवेळी केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येणार आहे. याकरिता आधारकार्ड,पॅनकार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना असा कुठलाही छायाचित्र ओळखपत्राचा पुरावा आवश्यक आहे.
------
Leave a comment