सर्वपक्षीय नेत्यांनी लावली घाटसावळीच्या शोभायात्रेला हजेरी
बीड । वार्ताहर
रामजन्मभूमी अयोध्येत साकारले जाणारे भव्य राममंदिर देशातील सर्व जाती,धर्म आणि पंथाच्या लोकांना एकत्र जोडणारा धागा आहे,आपल्या अनेक पिढ्यांच्या संघर्षाचे प्रतीक असलेल्या मंदिराशी नाते जोडण्यासाठी मंदिर निर्माण निधी संकलनात योगदान देऊन खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले.शोभायात्रेनंतर झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राम मंदिराच्या निर्मितीमागे आपल्या अनेक पिढ्यांचा संघर्ष उभा आहे,मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकांनी त्याग बलिदान दिले.त्यांच्या त्याग,बलीदान आणि संघर्षाला मंदिर निर्माणातुन यश मिळणार आहे.हे यश प्रत्यक्षात बघण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे.राम मंदिर ही केवळ वास्तू नसून सर्वांना एकत्र करणारी प्रेरणा आहे म्हणून मंदिराच्या निर्मितीमध्ये सर्वांनी योगदान देणे आवश्यक असल्याची भावना खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि अयोध्येत साकारल्या जाणार्या राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी देशभरात निधी संकलन अभियान राबविले जात आहे.आपल्या जिल्ह्यातून रेकॉर्डब्रेक निधी संकलन करून मंदिराच्या निर्मितीमध्ये आपल्याला शक्य तेवढे योगदान द्यायचे आहे.यावेळी त्यांनी निधी संकलनासाठी उपस्थितांना आवाहन केले.कार्यक्रमाला शांतीब्रम्ह ह.भ.प नवनाथ महाराज,शिवाजीराव फड,आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सुविद्य पत्नी सौ.नेहा संदीप क्षीरसागर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष जोशी,एस.एन कुलकर्णी,अरुण डाके,गंगाधर घुमरे,भाऊसाहेब डावकर,चंद्रकांत फड,प्रा.देविदास नागरगोजे,दादासाहेब लांडे,अरुण लांडे,आशा लांडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला भगिनींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
निधी संकलनासाठी भव्य शोभायात्रा
राममंदिर निधी संकलन अभियानासाठी खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.पारंपरिक वाद्यांच्या निनादात निघालेल्या शोभा यात्रेच्या स्वागतासाठी दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.तसेच पुष्पवृष्टीसह महिला भगिनींनी फुगडी आणि लेझीम खेळत यात्रेची शोभा वाढवीली.यावेळी जयश्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
Leave a comment