ठाणे आणि केज पोलीसांची संयुक्त कार्यवाही
केज । वार्ताहर
ठाणे येथून केज येथे एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणलेल्या प्रकरणाचा केज पोलीसांच्या मदतीने ठाणे पोलीसांनी तपास करून मुलगी व आरोपी ताब्यात घेतला.दि. 14 जानेवारी रोजी ठाणे शहर पोलीस स्टेशन हद्दीतून एका 19 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला फूस लावून केज येथे पळवून आणले. त्या प्रकरणी दि. 16 जानेवारी 2021 रोजी मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून ठाणे शहर पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हा गु. र. नं. 28/2021 रोजी अज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास ठाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत होते.
ठाणे पोलीसांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अल्पवयीन मुलीच्या मोबाईल कॉल तपशीला नुसार तीला एका तरुणाने पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी त्या दोघांचे सर्व कॉल डिटेल्स आणि लोकेशन याची सायबर गुन्हे शाखेकडून माहिती घेतली. सदर अल्पवयीन मुलगी व तिला पळवून आणणारा तरुण हा केज येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहिती वरून ठाणे शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण लोटणकर, चंद्रकांत सकपाळ, आप्पासाहेब भावाने व महिला कर्मचारी श्रीमती रुपाली पाटील यांचे एक पथक खाजगी वाहनाने केज येथे आले. त्यांनी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना सर्व माहिती देताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, बाळासाहेब अहंकारे व दिलीप गित्ते यांच्या पथकावर तपासाची कामगिरी सोपविली. त्या नंतर ठाणे व केज येथील अधिकार्यांनी संयुक्त कार्यवाही करीत त्या तरुणाचा वडील व त्याचा एक मित्र याला ताब्यात घेतले. मात्र ते दोघेही पोलीसांना खरी माहिती देत नव्हते; म्हणून त्या अल्पवयीन मुलगी व तो तरुण पोलीसांच्या हाती लागत नव्हते. त्यांना त्याचे वडील व मित्र हे लपविण्यास मदत करीत होते. ते दोघेही पोलीसात पासून काही तरी लपवीत असल्याचे दिसताच मग त्यांना पोलीस खाक्या दाखविताच त्यानी सर्व माहिती सांगितली. मग दि.25 जानेवारी रोजी पोलीसांनी सदर अल्पवयीन मुलगी व तिला पळवून आणणार्या तरुणास केज येथील शुक्रवार पेठ, समर्थ मठा जवळील एका घरातून ताब्यात घेतले. त्या तरुणावर ठाणे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असल्याने पोलीस पथक त्यांना घेऊन ठाण्याकडे प्रयाण केले. सदर मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणाच्या विरुद्ध भा. दं. वि. 363, 376 आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अंतर्गत कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Leave a comment