अंबाजोगाई । वार्ताहर
येथील मोंढा परिसरातील महाराष्ट्र बँकेच्या आवारातील विहिरीत बुधवारी (दि.20) एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. या मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
येथील महाराष्ट्र बँकेच्या आवारात जुनी विहीर आहे. काही वर्षापूर्वी पर्यंत ही विहीर वापरत होती. मागील काही काळापासून तिचा वापर बंद आहे. बुधवारी सकाळी बँकेचे दैनंदिन काम सुरु झाल्यानंतर 11 वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकांना दुर्गंधी पसरलेली जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पहिले असता पालथ्या अवस्थेत तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. बँकेच्या व्यवस्थापकांकडून याबाबत खबर मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रकाश सोळंके आणि घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी नगर पालिकेशी पत्रव्यवहार करूनही सहकार्य नाही. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजता अखेर सोळंके आणि घुगे यांनीच पुढाकार घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला आणि स्वारातीच्या शवगृहात पाठवून दिला. सदर मृतदेह पुरुष जातीचा असून त्याचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे. दोन ते तीन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a comment