घुशींमुळे नुकसान;झाडेझुडपे वाढली,
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
बीड । वार्ताहर
शहरातील वीरशैव समाजाच्या स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या स्मशानभुमीतील समाधींची मोडतोड झाली असून ठिकठिकाणी कचर्याचे ढिग जमा झाले आहेत. यामुळे अंत्यविधी करताना मोठी अडचण निर्माण होत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वीरशैव समाज बांधवांनी केली आहे.
शहरातील ग्रामदैवत कंकालेश्वर मंदिराच्या मागे वीरशैव समाजाची स्मशानभूमी आहे. मात्र या ठिकाणी मुलभूत सुविधांची वाणवा असल्याने नागरिकांना अंत्यविधी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंत्यविधी झाल्यानंतर समाधी बांधण्याची प्रथा असल्याने या स्मशानभूमीत अनेक वर्षांपासून समाधी उभारल्या आहेत. परंतु उंदीर, घुशी, कुत्र्यांनी समाधी पोखरुन काढली आहे. यामुळे पार्थिवाचे अवशेष उघड्यावर पडत आहेत. स्मशानभुमीत लाईटची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारात किंवा मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी केला जातो. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. कायमस्वरुपी निवारा तसेच अंतर्गत रस्ते नसल्याने उन्हाळा, पावसाळ्यात अंत्यविधी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. संरक्षण भिंत आणि गेट नसल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे तसेच समाज कंटकांकडून समाधीची विटंबना होत आहे. लाईट नसल्याने रात्री अंधाराचा फ ायदा घेत काही मद्यपी समाधीस्थळावर बसुन दारु पितात. शौचासाठीही स्मशानभूमीचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे विविध समस्यांनी वीरशैव समाज स्मशानभूमीला वेढले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन तसेच नगर पालिका प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी कुंभेश्वर विभूते, परमेश्वर नगरे, मनोज ढेपे, सचिन रेगुडे, किशोर जवळकर, अभिजीत मिटकरी,अमोल होनराव शांतीलिंग शेटे, अमोल कानडे तसेच समाज बांधवांनी केली आहे.
Leave a comment