तपासणीवेळी असलेली बायोमेट्रिक हजेरीच ग्राह्य धरणार
त्रुटी आढळलेल्या वसतिगृहांना पाठवणार शो-कॉज
बीड । वार्ताहर
ऊसतोडीसाठी स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी जिल्ह्यात 282 हंगामी वसतिगृह चालवली जातात.9 जानेवारीला या सर्व वसतिगृहांची जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सूचनेवरुन एकाचवेळी तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल सीईओंकडे तपासणी समितीने सादर केला. तपासणीमध्ये जिल्ह्यातील काही वसतिगृहांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत तर काही ठिकाणी स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे काही वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक हजेरीनुसार नोंद असलेल्या विद्यार्थ्यांपैकी कमी विद्यार्थी संख्या आढळून आली. हाच धागा पकडत आता तपासणीवेळी असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुनच अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान इतर त्रुटी असलेल्या वसतिगृह प्रमुखांना शो-कॉज नोटीस जारी केल्या जाणार आहेत.
बीड जिल्ह्यातून दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ऊसतोडणी साठी जिल्ह्यातून दरवर्षी लाखो मजूर स्थंलातरित होतात. अशावेळी त्यांच्या पाल्यांची व्यवस्था व्हावी म्हणून जि.प.कडून जिल्ह्यात दरवर्षी हंगामी वसतीगृह सुरु केले जातात. मात्र या वसतीगृहात नियमानुसार काम होते का? विद्यार्थी संख्या जितकी दाखवली जाते तितके विद्यार्थी उपस्थित असतात का? या व इतर सर्व मुद्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सीईओ अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व हंगामी वसतीगृहांची एकाचवेळी तपासणी करण्याचे आदेश जि.प.प्रशासनाला दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागातील अधिकार्यांना तपासणीच्या मोहीमेपासून दूर ठेवत जि.प.च्या कृषी, पंचायत, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण व अन्य विभागातील अधिकार्यांनी जिल्ह्यातील 282 वसतिगृहांची तपासणी केली. तसेच तालुकानिहाय अधिकार्यांची अदलाबदल केली होती. या तपासणीचा अहवाल सीईओंना सादर करण्यात आला असून त्रुटी आढळलेल्या वसतिगृहांना नोटीस बजावल्या जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
अशा आढळल्या त्रुटी
जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांची एकाचवेळी तपासणी झाली. या तपासणीदरम्यान काही वसतिगृहांमध्ये समाधानकारक स्थिती दिसून आली तर काही ठिकाणी किरकोळ व गंभीर त्रुटी आढळून आल्या. यात काही वसतिगृहांमध्ये दाखवलेल्या पटसंख्येपेक्षा 5 ते 10 टक्के कमी विद्यार्थी संख्या दिसून आली. तसेच बायोमेट्रिक प्रणालीत विद्यार्थ्यांची नोंद न घेणे, जेवणाचा दर्जा निम्न स्वरुपाचा आढळून आला. तपासणीदरम्यान काही वसतिगृहांध्ये व्यवस्थापक शिक्षकांची गैरहजेरी होती. याशिवाय स्वच्छतेचा अभाव, सामाजिक अंतर न राखणे, वसतिगृहाचे रेकॉर्ड अद्यावत नसणे अशा त्रुटी आढळून आल्या.
अधिकच्या त्रुटी असणार्यांवर कारवाई-अजित कुंभार
जि.प.प्रशासनाने हंगामी वसतिगृहांची तपासणी केली. सर्व अहवाल प्राप्त झाला असून काही वसतिगृहांमध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. सर्व माहिती संकलीत केली जात आहे. जिथे जास्त त्रुटी आढळल्या आहेत त्या वसतिगृहांना नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, तसेच ज्यांचे काम चांगले आहे, त्यांना प्रोत्साहन दिले जाईल अशी प्रतिक्रिया सीईओ अजित कुंभार यांनी दिली.
Leave a comment