आज 54 नवे रुग्ण ; बीड तालुक्यात आकडा वाढला
बीड । वार्ताहर
कोरोनाचा समुह संसर्ग कमी होत असल्याचे दिसुन येत असले तरी बीड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये अचानक झपाट्याने वाढ होवू लागली आहे. विशेषत: बीड तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. आज बुधवारी (दि.13) जिल्ह्यात 54 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. महत्वाचे म्हणजे यातील तब्बल 26 रुग्ण बीड तालुक्यातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनावर मात करता-करता आता एक वर्षाचा टप्पा लवकरच पुर्ण होणार आहे. दुसरीकडे कोरोना लस निर्माण करण्यास भारताला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर आता राज्य सरकारकडून या लसीचे वितरणही सुरु झाले आहे. येत्या 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राला लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात 9 लाख 63 हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे डोस खूप कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. एकीकडे लसीकरणाची तयारी वेगात सुरु असतांना अद्यापही कोरोनाचा विळखा कमी होतांना दिसत नाही.
बीड जिल्ह्यात आज बुधवारी 699 संशयीतांची तपासणी करण्यात आली. यातील 645 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर नवे 54 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 4, आष्टी 8, बीड 26, गेवराई 3, केज 4, माजलगाव 1, परळी 3, पाटोदा 3, शिरुर 3 तसेच वडवणी तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेष आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 17 हजार 218 झाली आहे तर, 16 हजार 320 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 543 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
सध्या तरी डॉक्टर सांगत असल्याप्रमाणे हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि खोकताना-शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळा.
तुम्हाला सर्दी-खोकला-ताप असेल तर काळजी घ्या, त्वरीत डॉक्टरांना दाखवा आणि आवश्यक ती औषधं घ्या.
Leave a comment