केजमध्ये एसीबीची मोठी कारवाई
केज । वार्ताहर
पाझर तलावात संपादित जमिनीचे क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल 1 लाख रूपयांची लाच मागणार्या तलाठ्यासह त्याच्या सहाय्यकास बीड ‘एसीबी’ने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.9) केज तहसील कार्यालय परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली.
एसीबीच्या माहितीनुसार, दयानंद जगन्नाथ शेटे (43) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन सुदर्शन घुले (31) असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे खरेदी केलेल्या 23 आर जमिनिपैकी 8 आर क्षेत्र पाझर तलावासाठी संपादित झाले असून ते सातबारावरून कमी न करण्यासाठी तलाठी दयानंद शेटे यानी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने बीड ‘एसीबी’कडे तक्रार दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे निरीक्षक राजकुमार पाडवी यांनी शनिवारी दुपारी केज येथे सापळा रचला. तिथे तक्रारदाराकडून 50 हजारांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे तलाठी शेटे याने मान्य करत लाचेची रक्कम खाजगी इसम सचिन घुले यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यावरुन तक्रारदारांनी ती 50 हजारांची रक्कम खाजगी इसम सचिन घुले यास दिली. यावेळी त्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान पोलीसांनी नंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजकुमार पाडवी तसेच कर्मचारी हनुमंत गोरे , प्रदीप वीर, मनोज गदळे चालक संतोष मोरे, गणेश म्हेत्रे यांनी केली.
खासगी लेखनिकांकडूनच कामे
तालुक्यातील अनेक तलाठी स्वतः काम करीत नसून सर्व कामे ही त्यांची खासगी लेखनिक करीत असतात. खासगी लेखनिक ठेवण्यामागे केवळ अशा प्रकारे गैरव्यवहार करून पैशाची मागणी करण्या करिता ठेवलेले असतात.
Leave a comment