शरद पवार संरक्षण मंत्री झाले. त्याच वेळी १९९१ ला, मी खासदार म्हणून निवडून आलो होतो. संरक्षण माझा विषय असल्यामुळे, पवारसाहेब संरक्षण मंत्री झाले म्हणून मला आनंद होणे साहजिक होते. शरद पवार अत्यंत तरुण असताना १९६७ ला आमदार झाले. माझे वडील सुद्धा त्यावेळी आमदार होते. त्यांच्यात चांगले संबंध होते. वडील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्या काळात शे का प हा डाव्या चळवळीचा महाराष्ट्रात प्रमुख पक्ष होता. त्यातच १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध झाले. माझ्यासारख्या असंख्य तरुणावर त्याचा परिणाम झाला. सर्व इंदिरा गांधींच्या धाडशी नेतृत्वावर आकृष्ट झाले. मी सैन्यात जायला प्रवृत्त झालो.
१९७८ ला, शरद पवार यांनी बंड करून काँग्रेस सोडून महाराष्ट्रात पुलोद सरकार बनवले. तरुणांना ते कौतुकास्पद वाटले. शे का प त्याचा एक भाग होता. म्हणून शरद पवारांकडे आकृष्ट होने हे साहजिक होते. त्यावेळी पवार साहेब प्रचंड मेहनत करताना दिसले. प्रत्येक तालुक्याला भेट देण्याचं त्यांनी सत्र सुरू केले व लोकांमध्ये पोहचले. पुलोद सरकार हे डाव्या विचारसरणीचे काँग्रेस च्या विरोधातील पाहिले सरकार होते म्हणून आमच्यासारखे अनेक तरुण पवार साहेबांकडे आशेने बघत होते. इंदिरा गांधींनी देखील देशात गरिबी हटाव नारा दिला होता. म्हणून दिल्लीत इंदिरा गांधी आणि महाराष्ट्रात पवारसाहेब ह्यांना राजकारणा बाहेर असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना योग्य नेतृत्व वाटत होते. मी सैन्यात अधिकारी झाल्यामुळे इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी सुद्धा आकर्षक वाटायची. बाहेर राजकारणात काय चालले आहे ते माहीत नसायचे. पण देश चांगला चालला असे वाटायचे. त्यात इंदिरा गांधींचे सरकार गेले आणि त्या परत १९८० ला प्रधानमंत्री झाल्या. शरद पवार यांचा काँग्रेस समाजवादी पक्ष महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष झाला. तो काळ माझ्यामते पवारसाहेबांना सुवर्ण काळ होता. कारण पवारसाहेब लोकात पोहचले. नंतरच्या यशाचे ते मानकरी त्या काळातील प्रचंड मेहनतीमुळे झाले. गाव गावातून ते लोकांपर्यंत पोहोचले. देशात एका तरुण नेत्याचा उदय झाला. मी माझ्या वडिलांना काँग्रेस मध्ये जायला आग्रह केला.
सर्व डावे पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. माझे वडील सुद्धा शरद पवार सोबत काँग्रेस मध्ये गेले. पण १९८६ ला पवारसाहेब पुन्हा राजीव गांधींच्या काँग्रेस मध्ये गेले. त्याच काळात मी गुप्तहेर खात्यात गेलो. राजीव गांधींचे काम जवळून बघायला मिळाले आणि मला खात्री पटली की देशाला मजबूत करायला राजीव गांधी हे योग्य नेतृत्व आहे. म्हणून पवारांचा निर्णय योग्य वाटला. पण माझ्या वडिलांची घोर निराशा झाली. काँग्रेस विरुद्ध मानसिकतेत वाढलेले माझे वडील पवारसाहेब बरोबर काँग्रेस मध्ये गेले नाहीत. त्या काळात शरद पवारांची माझी भेट महाराष्ट्र सदनात झाली. राजकारणात येण्याविषयी मला त्यांनी मार्गदर्शन केले. मी प्रवृत्त होऊन राजीव गांधींना भेटायला सुरू केले. अचानक मध्यवर्ती निवडणूक लागली. सैन्य सोडून निवडणूक लढण्यास तयार झालो. त्याला शंकरराव चव्हाण, प्रतापराव भोसले, गाङगीळ साहेब ह्यांनी पण पूर्ण पाठिंबा दिला. हा पवारसाहेब यांच्या विरोधातील गट होता पण ते मला माहित नव्हते. अचानक शरद पवार मला विरोध करू लागले. तोही टोकाचा विरोध. कारण त्यावेळी राजीव गांधींनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकायचा प्रयत्न केला होता. सगळेच राजकारण बदलले होते. त्यांनी मला भेटायला नाकारले. तेवढ्यात फोतेदार यांनी माझा सैन्यातील राजीनामा करून घेतला होता. मी रस्त्यावर आलो. इकडे शरद पवार तीव्र विरोध. राजीव गांधी यांची द्विधा मनस्थिती झाली. मधू दंडवते यांना बहुतेक निवडून आणायचा पवारांचा निर्णय झाला असावा. पण चव्हाण साहेबांनी राजीव गांधींना सांगितले, की ५० वर्षात राजापुरातून काँग्रेसचा कोणी निवडून आले नाही, तर पाडण्यासाठी तरी सावंतला तिकीट द्या. असे करून मी राजकारणात आलो. सुरवातीला पवारसाहेबांनी विरोधच केला पण राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांनी माझा प्रचार केला. ते मुख्यमंत्री असल्यामुळे मी निवडून येण्याचे चिन्ह दिसत होते. मी खासदार झालो. त्यानंतर ते प्रधानमंत्री होण्यासाठी शर्यतीत उतरले. मी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. खासदारांचे मतदान घेण्यात आले. पण नरसिंहरावना प्रधानमंत्री करण्याचे ठरले होते. मी पक्षाला नवीन असल्यामुळे मला माहित नव्हते. मी बलराम झाकर यांच्या पक्षाच्या निवडणूक आयोगाला सांगितले की पवारसाहेबांना प्रधानमंत्री बनवा. इतर सर्वांनी नरसिंहराव चे नाव घेतलें. झाकरनी नीलेंगेकरणा सांगितले की ह्यांना समजावा. निलेंगकरण महाराष्ट्र अध्यक्ष होते, त्यांनी मला समजावले की प्रधानमंत्री नरसिंहराव ना करायचे ठरले आहे. तुम्ही परत जा आणि आपले मत बदल. मी परत गेलो आणि माझे मत बदलले. एकंदरीत शरद पवार प्रधानमंत्री बनावे असे म्हणणारा मी एकटाच खासदार होतो.
पवारसाहेब संरक्षण मंत्री झाले तेव्हा जग बदलले होते. तोपर्यंत शीत युद्धात आपण रशियाच्या बाजूने होतो. अमेरिका जवळ जवळ आपला शत्रूच होता. रशियाचा दारुण पराभव झाला होता आणि रशिया अनेक तुकड्यात विभागला गेला होता. आपल्याविरुद्ध पाकने प्रचंड दहशतवाद निर्माण केला होता. पंजाब, आसाम, काश्मीर पेटला होता. अमेरिका पाकला पूर्ण मदत करीत होता. त्यातच भारत कर्जबाजारी होता. भारताला सोन विकावे लागले. अमेरिकेने भारताला मदत करायची अटी घातल्या. पहिली अट म्हणजे मनमोहन सिंग अर्थमंत्री करायचे व दुसरे म्हणजे खागजिकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) धोरण लागू करायचे. रशियाच्या विध्वंसामुळे भारत अडचणीत आला. तोपर्यंत सर्व युद्ध जन्य सामुग्री आणि हत्यारे ही रशिया कडूनच यायची होती.
या काळात भारताला सावरून घेण्याचे काम शरद पवारांनी आपली रशिया बरोबरची मैत्री कायम ठेवत अमेरिकेबरोबर सुद्धा संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याएवेळी रशियामध्ये आरजक्ता होती. त्यावेळी त्यात आपल्या हत्यारांचा आणि गोळा दारूचा पुरवठा कायम ठेवणायामध्ये यश आले. त्यांनी या दोन वर्षाच्या कारकिर्दीत सीमा भागातल्या अनेक ठिकाणी भेट देऊन सैन्याचे मनोबल वाढविले. तसेच आतंकवाद विरुद्ध जबरदस्त मोहीम ह्या दोन वर्षात करण्यात आली. त्यात पंजाब, आसाम शांत झाला. आणि काश्मीर मध्ये सुद्धा आतंकवाद निवळत आला. अर्थात गृहमंत्री श्री. शंकरराव चव्हाण आणि राजेश पायलेट यांचेही काम वाखाण्यासारखे होते. त्यावेळेला मला प्रत्यक्ष दिसून आले की शरद पवार यांची राजकरणावर पकड दूरदृष्टी आणि खोलवर जाऊन नियोजन करण्याची पद्धत ह्याची देशाला गरज आहे. पाकिस्तानला शह देण्यासाठी त्याच काळात भारताने इराण बरोबर मैत्री केली. त्यामुळे पाकिस्तान दोन्ही बाजूने घेरला गेला. त्याचा फायदा आजपर्यंत भारताला होत आहे. हत्याराच्या आधुनिकीकरणासाठी सुद्धा शरद पवारांनी हत्यारे उत्पन्न करणार्या कारखान्यांना आणि संस्थांना भेट देऊन चालना दिली. दुर्दैवाने त्याच काळात बाबरी मशीद उध्वस्त झाली. मुंबई आणि देशभर दंगली पेटल्या. आणि शरद पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री या पदाचा धुरा सांभाळावा लागला.
शरद पवार यांचे लोकांना आपलेसे करण्याचा स्वभाव आणि मानवी स्वभावाचा प्रचंड अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकरणात आणि संरक्षण क्षेत्रात देशाला उपयुक्त ठरला असता. पण दुर्दैवाने त्यांची कारकिर्दी ही अर्धवटच राहिली. नाहीतर यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर सह्याद्रीची साथ हिमालयाला पुन्हा एकदा मिळाली असती. शरद पवार यांच्या कर्तुत्वाला तोड नाही. कारण देशाला आणि देशातील लोकांना लागणार्या सर्व गोष्टीचा त्यांना अभ्यास आहे. पण ते प्रचंड विवादात सुद्धा नेहमी असतात. म्हणून मी शरद पवार यांना एक रहस्य म्हणेन. त्यांच्या राजकीय चालीला कोणीच ओळखू शकत नाही. हे त्यांच्या राजकीय अस्तित्वाचे रहस्य आहे. पण संपूर्ण लोकप्रियता संपादन करण्यातील अपयश देखील आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९
Leave a comment