- दीपाली जगताप
- बीबीसी मराठी
फोटो स्रोत,@CMOMAHARASHTRA
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन पक्ष म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढत आहेत. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
तसंच तीन पक्ष मिळून लढत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. याअर्थाने ठाकरे सरकारसाठी ही प्रतिष्ठेची कसोटी आहे.
महाविकास आघाडीने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात उतरला आहे.
पुणे, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर मतदार संघ तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक पार पडत आहे.
महिन्याभरापासून सत्ताधारी पक्षातील नेते आणि भाजप नेत्यांच्या प्रचारफेऱ्या या पाच मतदारसंघात सुरू आहेत. या पाचही मतदारसंघात सत्ताधारी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.
ही निवडणूक ठाकरे सरकारसाठी महत्त्वाची का आहे? महाविकास आघाडीसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे का? आणि या पाचही मतदारसंघात राजकीय समीकरण काय आहेत? अशा सर्व मुद्यांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
फोटो स्रोत,EPA
पुणे पदवीधर मतदारसंघ
पुणे पदवीधर मतदारसंघाअंतर्गत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर असे पाच जिल्हे येतात. या मतदारसंघात चार उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, मनसेच्या रुपाली पाटील आणि जनता दल सेक्यूलरकडून शरद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संग्राम देशमुख, अरुण लाड आणि शरद पाटील हे तिन्ही उमेदवार सांगली जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागाणी होणार. त्यामुळे पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर येथिल मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.
पुण्यात एकूण 4 लाख 26 हजार 257 एकूण मतदार आहेत.
फोटो स्रोत,DEVENDRA FADNAVIS/SOCIAL MEDIA
देवेंद्र फडणवीस नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर .(1 डिसेंबर 2020)
नागपूर पदवीधर मतदारसंघ
या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे संदीप जोशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आपला परंपरागत मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे.
भाजपने महापौर संदीप जोशी यांना विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. संदीप जोशी हे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
तर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अभिजीत वंजारी यांच्यासाठी सभा घेतल्या. ऊर्जामंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी नागपूरमध्ये प्रचार केला.
नागपूर पदवीधर मतदारसंघात 2 लाख 6 हजार 454 एकूण मतदार आहेत.
फोटो स्रोत,GETTY IMAGES
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ
या मतदारसंघातही मुख्य लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात लढत होणार आहे. सतीश चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. ते तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूकीला उभे असून त्यांच्यासमोर भाजपचं आव्हान आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात 3 लाख 73 हजार 166 एकूण मतदार आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ
अमरावती शिक्षक मतदारसंघाअंतर्गत वाशिम, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ असे पाच जिल्हे येतात. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार नितीन धांडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपसाठी हा मतदारसंघ आव्हानात्मक आहे. कारण भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपच्या मतांची विभागणी होऊ शकते.
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी 35 हजार 622 एकूण मतदार आहेत.
फोटो स्रोत,MAHARASHTRA INFORMATION CENTRE
पुणे शिक्षक मतदारसंघ
पुणे शिक्षत मतदारसंघात विद्यमान आमदार, महाविकास आघाडी आणि भाजप अशी तिघांमध्ये लढत दिसून येत आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय सामंत, भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाविकास आघाडीला मतदार स्वीकारणार?
पदवीधर निवडणुकीसाठी पदवीधर मतदार नोंदणी करतात तर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिक्षक मतदान करतात. यामुळे या निवडणुकीत मतदार वर्ग हा इतर निवडणुकांपेक्षा वेगळा असतो.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता परंपारिक पक्षांना आपला मतदारसंघ कायम राखण्यात यश मिळते. पण यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने पदवीधर आणि शिक्षक कुणाला कौल देतात? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
फोटो स्रोत,DIBYANGSHU SARKAR / GETTY IMAGES
ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र झोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "या निवडणुकीतला सर्वांत महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मतदार आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदार हे सामान्य आणि शिक्षित वर्गातला बहुतांश मतदार आहे. त्यामुळे यांना आपण निर्णायक मतदार म्हणू शकतो."
महाविकास आघाडीचा हा प्रयोग मतदार कशापद्धतीने स्वीकारतात हे या निकालातून कळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि भाजप दोघांसाठीही यंदाची पदवीधर आणि शिक्षक निवडणूक अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे.
फोटो स्रोत,GETTY IMAGES
ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची का आहे?
महाविकास आघाडीने सत्तास्थापन केल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. शिवाय, महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच एकत्रित आपले उमेदवार उभे केले आहेत. या दोन्ही कारणांमुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सत्ता स्थापनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं बदलली आहेत. स्थानिक नेत्यांना राजकीय संघर्ष बाजूला ठेऊन महाविकास आघाडीसाठी काम करावं लागत आहे. या परिस्थितीत बंडखोरी होण्याचा धोकाही आहे.
प्रामुख्याने शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणं कशी जुळवायची असाही प्रश्न आहे.
धर्मेंद्र झोरे याबाबत सांगतात, "तीन पक्ष एकत्र आल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण पूर्णपणे बदलेलं आहे. महाविकास आघाडीला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास यापुढील निवडणुकाही एकत्र लढवाव्या लागणार आहेत. त्यादृष्टीने होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा आहे. हा निकाल भविष्यातील निर्णय घेण्यास तिन्ही पक्षांसाठी उपयोगी ठरेल."
फोटो स्रोत,GETTY IMAGES
भाजपनेही या निवडणुकीसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. विधानसभा 2019 निकालातही भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. सर्वाधिक जागा या भाजपनेच जिंकल्या होत्या पण तरीही भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यामुळे या निवडणुकीतही अव्वल राहण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतो.
ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे याबाबत सांगतात, "उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतरही ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी तर प्रतिष्ठेची आहेच पण बिहारहून प्रचार करून आलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही महत्त्वाची आहे. भाजपही जोरदार प्रयत्न करताना दिसते आहे."
ते पुढे सांगतात, "भाजपने प्रचंड लक्ष घालण्यास सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे."
निकालाचा परिणाम पुढील राजकीय समीकरणं बदलणार?
पदवीधर निवडणुकांच्या निकालाचे थेट परिणाम पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर होणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आणि मतदार वर्ग वेगळा आहे.
फोटो स्रोत,TWITTER / @NCPSPEAKS
सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत यश आल्यास महाविकास आघाडीचा एकत्र निवडणुक लढवण्यासंदर्भातील आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे असं सांगतात, "पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होत नसतो. पुढील निवडणुकांची समीकरणंही यामुळे बदलणार नाहीत. पण यंदाची निवडणूक वेगळी असल्याने यात महाविकास आघाडीला अपयश आल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याचा फायदा भाजपला होईल."
ते पुढे सांगतात, "तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असल्याने यात यश आल्यास पुढील निवडणुकाची रणनीती आणि बोलणी सुकर होऊ शकते हे नक्की."
Leave a comment