जिल्ह्यात 60 नवे रुग्ण;39 जणांना सुटी
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोना मृत्यूची संख्या आता थेट पाचशेच्या उंबरठ्यावर पोहचू लागली आहे. नवे रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा प्रशासनाला बर्यापैकी यश येत असले तरी मृत्यूचे प्रमाण रोखण्यात अद्यापही यंत्रणा अपयशी ठरत आहे. शनिवारी (दि.28) जिल्ह्यात पुन्हा तीन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्यामुळे एकुण मृत्यूसंख्या 491 झाली. दिवसभरात 60 नवे रुग्ण आढळले तर 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मृत्यू झालेल्यांमध्ये भोगलवाडी (ता.धारुर) येथील 70 वर्षीय पुरुष, पिंपळनेर (ता.बीड) येथील 55 वर्षीय पुरुष व गेवराईतील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी 1 हजार 160 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 1100 अहवाल निगेटिव्ह आले तर 60 कोरोना बाधित निष्पन्न झाले. यात अंबाजोगाई 12, आष्टी 5, बीड 20, गेवराई 2, केज 3, माजलगाव 3, परळी 9, शिरूरकासार 1 तर वडवणी तालुक्यातील 5 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 15 हजार 530 एवढी झाली आहे. पैकी 14 हजार 532 कोरोनामुक्त झाले असून 491 जणांचा मृत्यू झाला आहे तर 507 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.
89 शिक्षक बाधित
दरम्यान, शनिवारच्या 60 कोरोना बाधित रुग्णांमध्ये 5 शिक्षकही बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधित आढळून आलेल्या शिक्षकांचा आकडा 89 इतका झाला.जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment