बीड । वार्ताहर
राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या घरात वाढत चालली आहे. अशावेळी कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी अनेकांनी ऑक्सिमीटर खरेदी सुरु केली आहे. ते गरजेचेही आहे, मात्र ऑक्सीमीटरव्दारे रक्तातील ऑक्सीजनची तपासणी करताना काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. बर्याचदा एकाच हाताच्या पाचही बोटांना वेगवेगळे ऑक्सिमीटर लावल्यावर वेगळेवेगळे आकडे दिसत असल्याचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे नेमका कशा प्रकारचा ऑक्सिमीटर वापरावा, याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.
ऑक्सीमीटर कंपनीचे नाव, यापूर्वीची उत्पादने आणि त्यांचा दर्जा, सध्याचा दर्जा तपासून पहावा.तसेच विश्वासार्ह आणि अधिकृत औषध विक्रेत्यांकडून खरेदी करावी. शिवाय रिडींगमध्ये तफावत जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. यातून ऑक्सिमिटरची विश्वासार्हता तपासण्यास मदत होते. प्रत्येकाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा उपयोग होतो. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फुफुसाला संसर्ग झाल्याने श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळीही खालावते.
पल्स ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते.कोरोनाबाधित रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्क्यांहून जास्त असले पाहिजे, असे वैद्यकतज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्सिजनची मात्रा 90 पेक्षा खालावल्यास आणि बराच वेळ तशीच राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.सध्या विविध किमतीचे ऑक्सिमीटर बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती 500 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. कोणताही ऑक्सिमीटर घेताना कंपनीचा ब्रँड आणि उत्पादनाची विश्वासार्हता तपासून पाहणे आवश्यक मानले जाते. बहुतांश ऑक्सिमिटरचे उत्पादन चीन, तैवान येथे होते. भारतीय बनावटीचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. ग्राहकांकडून ऑक्सिमिटरची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे डिव्हाईस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. विश्वासार्ह दुकानदारांकडून खरेदी केल्यास फसवणूक टळू शकते असे औषध विक्रेत्यांनी म्हटले आहे.
असा करावा ऑक्सीमीटरचा वापर
सध्या अनेक लोक होम क्वारनटाईन व होम आयसोलेशनमध्ये आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांनी दररोज 2 वेळा तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या सौम्य कोरोना रुग्णांनी दिवसातून 2 वेळा आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांच्या रुग्णांनी दर सहा तासांनी आपली ऑक्सिजनची पातळी तपासून पहावी. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी घटत असल्यास ती लवकर लक्षात येऊन त्याचे उपचार सुरु करता येतात. तसेच या सर्वांनी रोज दोन वेळा 6 मिनिट वॉक टेस्ट करावी.पण हे सर्व करत असताना नेमक्या कुठल्या बोटाला पल्स ऑक्सीमीटर लावायचा हे माहित असायला हवा. यासाठी जो हात आपण कामासाठी जास्त वापरतो व ज्या हाताने लिहितो, त्या हाताचे मधले बोट वापरायला हवे म्हणजे सर्वात मोठे बोट. पल्सऑक्सीमीटर हे बोटाच्या टोकाला म्हणजे नख व त्या मागच्या भागावर लावून पाहिले जाते.यात मधल्या बोटाला हाताच्या दोन्ही मुख्य रक्त वाहिन्यांचा प्रवाह असतो.तुलनेने इतर बोटांना कमी असतो. म्हणून लिहिण्यासाठी वापरल्या जाणार्या मधल्या बोटाला सर्वात अचूक पल्सऑक्सीमीटरची रीडिंग येते.
Leave a comment