मुसळधार पाऊस, प्रकल्पीय पाणी साठा वाढला
बीड | वार्ताहर
बीड आणि वडवणी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यन्त पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरूच होती. बीड महसूल मंडळासह तालुक्यातील पेंडगाव, पिंपळनेर, म्हाळस जवळ्यासह वडवणी आणि कौडगाव मंडळात अतिवृष्टी, झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील प्रकल्पीय पाणी साठाही वाढला आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि.20) रात्रीपासून बीड, वडवणी माजलगाव, अंबाजोगाई, शिरूर, धारूर, परळी, केज या तालुक्यात पावसाने हजेरी लावली. बीड शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. बीड शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमले होते.जोरदार पावसामुळे पेरणी झालेल्या खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीडसह परिसरातील गावातही मुसळधार पाऊस झाला.
बीड तालुक्यातील म्हाळस जवळा मंडळात विक्रमी 155 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. याशिवाय पिंपळनेर मंडळात 142, बीड महसूल मंडळात 100 तर पेंडगाव मंडळात 85 मिलीमीटर पाऊस पडला आहे. वडवणी मंडळात 80 तर कौडगाव मंडळात 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.65 मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस अतिवृष्टी गणला जातो.
बीड जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या लवकर उरकल्या आहेत.सध्या पिकांची वाढही समाधानकारक झाली आहे. सोमवारी दुपारपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती.सायंकाळी काही वेळ उघडीप दिल्यानंतर रात्री जिल्ह्यात पुन्हा अनेक भागात पावसाचे पुनरागमन झाले अन् रात्रीतून बीड तालुक्यातील 4 तर वडवणी तालुक्यातील 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.मुसळधार पावसामुळे बीड शहरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले.पावसादरम्यान काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.रात्रीतून जिल्ह्यात एकूण 21.30 मि.मी.तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 52.65 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस (आकडे मिलीमीटरमध्ये)
बीड - 56, गेवराई- 34.6, शिरूर- 22, वडवणी- 79, अंबाजोगाई- 30.8, माजलगाव 48.7, केज - 9.3, धारूर 16.3, परळी 19, पाटोदा 3.5, आष्टी 3.1
Leave a comment