बोगस बियाणे प्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत 15 गुन्हे
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात पेरलेले सोयाबीन न उगवल्याप्रकरणी शेतकरी कृषि विभागाकडे दाखल करत असलेल्या तक्रारींवरुन संबंधित कंपन्यांविरोधात कृषि विभागाकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. रविवारी (दि.12) पाटोदा व चकलांबा ठाण्यात आणखी दोन गुन्हे नोंदवले गेले.दरम्यान बोगस बियाणे प्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत 15 गुन्हे नोंदवले गेले आहेत.
रविवारी पाटोदा पोलिस ठाण्यात कृषी अधिकारी जयेश भूतपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बुस्टर प्लॉट जेनेटिक्स प्रा.लि.या औरंगाबाद स्थित बियाणे कंपनीसह व्यवस्थापक गजानन केशव जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पो.ह.क्षीरसागर या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान याचदिवशी चकलांबा (ता.गेवराई) पोलीस ठाण्यातही अन्य एका बियाणे कंपनीविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिरुरकासारचे तालुका कृषि अधिकारी भिमराव बांगर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुजरातमधील वीसनगर येथील संजय सिड्स कार्पोरेशन या बियाणे कंपनी विरोधात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांचा पुरवठा करुन शेतकर्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.पो.ना.सानप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment