खरिपाच्या पिकांना दिलासा
बीड । वार्ताहर
बीड शहर व परिसरात सोमवारी दुपारी पावसाचे आगमन झाले. दुपारपासून या पावसाची रिमझिम सुरुच होती. दरम्यान बीड तालुक्यातही काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उगवून आलेल्या कापसासह खरिपातील इतर पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत एकुण 42.43 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
बीड तालुक्यात रविवार व सोमवारी पावसाने हजेरी लावली, मात्र आगमन झाले असले तरी या पावसाचा वेग फार समाधानकारक नव्हता. असे असले तरी पावसामुळे शेत पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. बीड तालुक्यात अजुनही मोठ्या पावसाची गरज आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास बीड शहर व परिसरात चांगला पाऊस झाला.शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमले होते.
सध्या जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. असे असले तरी यंदा बहुतांश ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे. सोमवारी सकाळपर्यंत बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 42.43 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात 10.2 मिलीमीटर, शिरुरकासार 15.7, वडवणी-20.5, माजलगाव 3.8 मि.मी.पावसाची नोंद झाली असून अन्य तालुक्यात पाऊस नाही.
Leave a comment