गेवराई । वार्ताहर
येथील न.प.च्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये स्वॅब घेतलेल्या एका 35 वर्षीय तरुणाने सभागृहात कक्षामध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेने आरोग्य प्रशासन आणि गेवराई तालुका हादरुन गेला आहे. तरुणाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील चकलांबा नजिक असलेल्या बाबुलतारा तांडा येथून कोरोनाची लक्षणे आढळल्याने एका 35 वर्षीय तरुणाला गेवराई येथील न.प.सभागृहात क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याचा शुक्रवारी (दि.10) स्वॅबही घेण्यात आला होता, मात्र अहवाल आला नव्हता. शनिवारी (दि.11) सायंकाळी त्याला जेवणाचा डब्बा घेवून कर्मचारी गेले होते. त्यासाठी त्याला आवाजही दिला, मात्र तो उठलाच नाही. मात्र येथील कर्मचार्यांनी क्वॉरंटाईन सेंटरचे प्रमुख येवले यांना हा प्रकार कळवला. त्यानंतर त्यांनी बाजूला असलेल्या खिडकीतून आवाज देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रुग्णांचा मृतदेह पंख्याला लटकत असल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांनी गेवराई पोलीस आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना दिली. त्यानंतर आरोग्य प्रशासनातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेवून पीपीई कीट परिधान करुन मृतदेह रुग्णालयात हलवला. तरुणाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान या घटनेने क्वॉरंटाईन सेंटरमध्ये थांबलेल्या रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Leave a comment