दोन मृत्यूमुळे बीड जिल्ह्यात खळबळ
बीड । वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणार्या (ता.गेवराई) येथील 54 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा बाथरुमसाठी जाताना पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.अद्याप आरोग्य यंत्रणेने त्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.तर पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील एक कोरोनाग्रस्त रुग्ण पुणे येथील ज्युपीटर रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही शुक्रवारी (दि.10) दुपारी मृत्यू झाला.सहा दिवसांपूर्वी या रुग्णालयात दाखल झाला होता.
गेवराई तालुक्यातील उमापूर येथील या व्यक्तीला कोरोना लक्षणे दिसू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यापूर्वी तो रुग्ण चार दिवस बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. नंतर तेथून तो गावी परतला होता. ही माहिती मिळाल्यानंतर गेवराईच्या आरोग्य पथकाने त्यास उमापूर येथून जिल्हा रुग्णालयात आणले होते. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यानंतर दोन दिवसापूर्वी तो पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला उमापूर येथून गेवराईच्या आरोग्य अधिकारी आणि पथकाने बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्याचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी बाथरुमसाठी जाताना पाय घसरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील एक रुग्ण पुण्यातील ज्युपीटर रुग्णालयात कोरोनाबाधित झाल्याने दाखल केला गेला होता. 4 जुलैपासून त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरु होते. दरम्यान 6 दिवस उपचार झाल्यानंतर त्याची प्रकृती अचानक खालावली अन् शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अद्याप बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर याची नोंद झालेली नाही.
Leave a comment