शहरातील 11 ठिकाणी पूर्णवेळ संचारबंदी
बीड । वार्ताहर
समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 2 ते 9 जुलैपर्यंत संपूर्ण बीड शहर लॉकडाऊन केले होते. रात्री उशिरा या संदर्भातील आदेश काढून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरातील लॉकडाऊन उठवून संचारबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे आज 10 जुलैपासून बीड शहरातील व्यवहार, बाजारपेठ पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे.दरम्यान संचारबंदी शिथिल केली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर राखून तोंडाला मास्क बांधून सर्व ती काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशामध्ये संपूर्ण संचारबंदी व प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल करण्यात आल्याचे नमूद केले आहे. मात्र शहरातील 11 भागांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. त्याठिकाणी पूर्णवेळ पुढील अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू राहील असे आदेशामध्ये म्हटले आहे. बीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील शेख महंमद शेख मसूद यांच्या घरापासून ते शेख ताजुद्दिन यांच्या घरापर्यंत, आसेफ नगरमध्ये सय्यद सिराजुद्दीन सैयद खुदबुद्दीन यांच्या घरापासून ते शेख मतीन मोहम्मद उस्मान यांच्या घरापर्यंत, बीड मामला भागात आयशा किराणा ( शेख इब्राहिम ) पासून ते अब्दुल मुजीब वाहिद यांच्या घरापर्यंत, औटे गल्ली येथे अखिलोद्दीन सरदार इनामदार यांच्या घरापासून ते विशाल विजयकुमार थिगळे यांच्या घरापर्यंत, पांडे गल्ली येथे गणेश मदनराव बलदवा यांच्या घरापासून ते बाबुराव माणिकराव धायगुडे यांच्या घरापर्यंत, डीपी रोड बीएसएनएल ऑफिस जवळ बारकुल हॉस्पिटल ते अजिनाथ नवले यांच्या घरापर्यंत, परवाना नगर खंडेश्वरी रोड भागात महारुद्र नागनाथ आप्पा माडेकर यांच्या घरापासून ते दत्त मंदिर पर्यंत ,विद्यानगर पश्चिम या भागात घुमरे कॉम्प्लेक्स, गोविंद नगर भागात बळीराजा कॉम्प्लेक्स ते गोपाळ अपार्टमेंट, मोमीन पुरा सागर कटपिस सेंटर ते फातेमा बुक डेपो पर्यंत कंटेनमेंट घेऊन घोषित करण्यात आला आहे.
दरम्यान गुरुवारी कोरोना बाधीत निष्पन्न झालेल्या एका रुग्णाने शहरातील एका रुग्णालयात उपचार घेतले होते, ही माहिती समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदरील रुग्णालय बंद केले आहे.शिवाय बीड शहरातील कंटेटमेंट झोन परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज जिल्ह्यातून 292 स्वॅब तपासणीला
बीड जिल्ह्यातून आज शुक्रवारी (दि.10) सकाळी आणखी 292 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या प्रयोग शाळेत पाठवले जातात. आज शुक्रवारी सकाळी 292 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहे. या जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-22, कोव्हीड केअर सेंटर बीड-90, ग्रामीण रुग्णालय आष्टी -15, ग्रामीण रुग्णालय माजलगाव-27, उपजिल्हा रुग्णालय गेवराई -18, उपजिल्हा रुग्णालय केज 14, उपजिल्हा रुग्णालय परळी-66, स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई-16 आणि कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई-24 इतक्या स्वॅबचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
Leave a comment