254 निगेटिव्ह तर 3 रिपोर्ट अनिर्णयीत
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात गुरुवारी (दि.9) आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात अंबाजोगाईतील 2 तर बीड शहर, धारुर, परळी व गेवराई शहरातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी गुरुवारी सकाळी जिल्ह्यातून 263 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले होते. पैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 254 रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 रिपोर्ट अनिर्णयीत आले आहेत. त्यामुळे गत दोन दिवसांपासून दोन अंकी वाढ झालेल्या बाधितांचा आकडा काही अंशी कमी झाला आहे, मात्र असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे.
बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाई येथील देशपांडे गल्लीतील 55 वर्षीय पुरुष (फिरता व्यावसायिक) आणि सातपुते गल्ली अंबाजोगाई येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या 28 वर्षीय पुरुष सहवासीताचा समावेश आहे. याशिवाय बीड शहरातील काळे गल्ली येथील 50 वर्षीय महिला, धारुर शहरातील अशोकनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 70 वर्षीय महिला, परळीतील मोंढा मार्केट एसबीआय शाखेतील 60 वर्षीय पुरुष कर्मचारी, उमापूर (ता.गेवराई) येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आता 68 जणांवर उपचार सुरु
बीड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 193 वर पोहचली आहे.यापैकी कोरोनामुक्त घेवून घरी परतलेल्या व्यक्तींची एकुण संख्या 118 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गुरुवारी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता सद्यस्थितीत बीड जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे व मुंबई येथे उपचार सुरु असलेल्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 68 झाली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment