परळी, अंबाजोगाईसह धारूरमधील एकाचा समावेश
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात सोमवारी (दि.6) आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात परळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियातील दोन कर्मचाऱ्याच्या समावेश आहे.यातील 1 परळीतील तर दुसरा कर्मचारी अंबाजोगाई येथील शिक्षक कॉलनी, मोरेवाडी येथील आहे.याशिवाय धारूर येथील अशोकनगरमधील मुलाचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे.शनिवारी 9 तर रविवारी जिल्ह्यात 6 बाधीत रुग्णांची भर पडली आहे.शिवाय रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या एका वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी आरोग्य विभागाने 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवले होते. यातील परळी येथील बँक कर्मचारी 34 वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी, मोरेवाडी अंबाजोगाई येथील 45 वर्षीय बँक कर्मचारी तसेच मुबंईहून धारूर येथील अशोकनगरमध्ये परतलेल्या 10 वर्षीय मुलगा या तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अन्य 186 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह तर 8 रिपोर्ट अनिर्णयीत आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. महत्वाचे हे की, सोमवारी बीड जिल्हा रुग्णालय व कोव्हीड केअर सेंटर बीड येथून सर्वाधिक 78 स्वॅब तपासणीला घेण्यात आले होते, त्यातील बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मागील तीन दिवसात बीड शहराला दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -34,स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई-4, उपजिल्हा रुग्णालय परळी-38, उपजिल्हा रुग्णालय केज-24,ग्रामीण रुग्णालय माजलगाव-8,उपजिल्हा रुग्णालय गेवराई -7,ग्रामीण रुग्णालय आष्टी -3, कोव्हीड केअर सेंटर बीड -44 आणि कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून 35 स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. यातील 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
Leave a comment