बीडमध्ये उपचार घेणार्या वृध्दाचा मृत्यू
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रविवारी (दि.5) सायंकाळी बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या गंगादेवी (ता.आष्टी) येथील एका वृध्दाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळीच त्यांचा स्वॅब घेतला होता.रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला, मात्र तत्पूर्वीच सायंकाळी सहाच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी याला दुजोरा दिला आहे.
रविवारी सकाळी बीड जिल्ह्यातून 248 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात आष्टी तालुक्यातील गंगादेवी येथील एका 65 वर्षीय वृध्द व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचाही समावेश होता. रात्री उशिरा सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यात 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होते. यात गंगादेवी येथील वृध्दाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला होता,मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधित रुग्णाचा सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 7 झाली आहे.
आत्तापर्यंत सात बळी
बीड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाने सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात पाटण सांगवी(आष्टी) येथे नातेवाईकाकडे आलेली महिला, माळेगाव (केज) येथील महिला, मातावळी (आष्टी) येथील तरुण,परळी येथील महिला, गहुखेल (आष्टी) येथील तरुण, गिरवली (उस्मानाबाद) येथील तरुण व रविवारी गंगादेवी येथील वृद्धाचा मृत्यू झालेला आहे.
Leave a comment