बीडमध्ये 2, आष्टी तालुक्यात 2 तर अंबाजोगाई, परळीतील प्रत्येकी 1 पॉझिटिव्ह
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात रविवारी (दि.5) आणखी 6 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी सकाळी 248 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. रात्री सर्व अहवाल प्राप्त झाले. यात 239 अहवाल निगेटिव्ह आले तर 3 अहवाल अनिर्णयीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये बीडच्या जुना बाजार येथील एक 38 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा तसेच अलिबागहून अंबाजोगाईतील कबीरनगर येथे परतलेली 40 वर्षीय महिला, मुंबईहून सुरडी (ता.आष्टी) येथे परतलेली 30 वर्षीय महिला, गंगादेवी (ता.आष्टी) येथील 65 वर्षीय वृध्द पुरुषाचा तसेच परळीतील एका 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रविवारी सकाळी बीड जिल्ह्यातून तब्बल 248 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवले होते.यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-32, कोव्हीड केअर सेंटर बीड -55, स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई-2, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई -46, उपजिल्हा रुग्णालय परळी - 50,उपजिल्हा रुग्णालय केज-28,उपजिल्हा रुग्णालय गेवराई -19 आणि ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून 16 जणांच्या स्वॅबचा समावेश होता. पैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह, 239 अहवाल निगेटिव्ह आणि 3 अहवाल अनिर्णयीत आले आहेत.
आता 33 जणांवर उपचार सुरु
बीड जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत एकुण बाधित रुग्णांची संख्या 146 वर पोहचली होती. गेवराईतील एक जण नगरमध्ये कोरोनाबाधीत आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 147 झाला होता. यातील 113 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी तपासणीला पाठवलेल्या 248 पैकी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता बीड जिल्ह्यात उपचार सुरु असणार्या रुग्णांची संख्या 33 झाली आहे तर एकुण बाधित रुग्णांची संख्या आता 153 वर पोहचली आहे.
Leave a comment