जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश जारी
बीड । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी तसेच चेहर्यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग पाळणे आता जिल्ह्यात गरजेचे झाले आहे. या सर्व बाबींचे पालन व्हावे यासाठी आता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नव्याने आदेश दिले आहेत. यापुढे सार्वजनिक स्थळी थुंकणे, मास्क न वापरणे, तसेच किराणा दुकानदारांनी वस्तुंचे दरपत्रक न लावणे, 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसह कोणी आढळून आल्यास संबंधितावर वेगवेगळ्या रक्कमेच्या दंडात्मक व फौजदारी कारवाया केल्या जाणार आहेत.
यापुढे सार्वजनिक स्थळी जसे की, रस्ते,बाजार, रुग्णालय, कार्यालय परिसरात थुंकल्यास 1000 रुपयांचा दंड केला जाणार आहे. सार्वजनिक स्थळी चेहर्यावर मास्क वापरला नाही तर 500 रुपये दंड, याशिवाय दुकानदार, फळ भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखल्यास 200 ग्राहकांना 200 रुपये तर आस्थापना मालाक, दुकानदार,विक्रेत्यांना तब्बल 2000 रुपयांची दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली जाणार आहे.
या दंडाबरोबरच किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास 5000 रुपये, सार्वजनिक स्थळी एखादी व्यक्ती 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसह आढळून आल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तिक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा इत्यादी घेवून जात असल्यास संबंधितालाही 1000 रुपयांचा दंड केला जाणार आहे. दरम्यान हीच चूक संबंधिताने दुसर्यांदा केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
Leave a comment