मध्यप्रदेशच्या वरदान बायोटेकसह नागपूरच्या महागुजरात कंपनीवर केजमध्ये गुन्हा
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीनचे बियाणे सदोष असल्याचे निष्पन्न होत आहे. गुरुवारी बीड शहर ठाण्यात दोन तर परळीत एका बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा परळी शहर ठाण्यात एकुण 4 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. शनिवारी (दि.4) केज पोलीस ठाण्यात मध्यप्रदेशच्या उज्जेनमधील वरदान बायोटेक व नागपूरच्या महा गुजरात प्रायव्हेट लिमिटड या दोन कंपन्यावर शेतकर्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे 3 दिवसात सोयाबीन उत्पादक कंपन्यावर एकुण 6 गुन्हे दाखल झाले आहेत.
केज पंचायत समितीचे कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने आणि कृषी अधिकारी अमोल डाके यांनी केज ठाण्यात शनिवारी दोन्ही कंपन्यांविरुध्द स्वतंत्र तक्रारी दिल्या आहेत. देशमाने यांच्या फिर्यादीनुसार महागुजरात प्रा.लि. (कॉटन मार्केट,नागपूर) या सोयाबीन बियाणे कंपनीने केजमध्ये सोयाबीनचे बियाणे वितरित केले होते. मात्र शेतकर्यांनी पेरलेले जेएस 335, डीएस 228, एमएयुल 71 व इतर वाण शेतात उगवलेच नाही. तालुका तक्रार निवारण समितीने पेरणी क्षेत्रावर जावून पाहणी केली असता या वाणाची उगवन क्षमता केवळ 5 ते 40 टक्के म्हणजेच अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाल्याने बियाणेच सदोष असल्याचे पुढे आले. निकृष्ठ दर्जाचे सोयाबीन बियाणे पुरवून शेतकर्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महागुजरात प्रा.लि. नागपूर या कपंनीसह कंपनीचे जबाबदार व्यक्ती अशोक नथुराम जोशी यांच्यावर केज ठाण्यात भादंविचे कलम 420,34 सह बियाणे नियम 1968 चे कलम 23 (अ)1 बीज अधिनियम 6 (ब), 7 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
वरदान बायोटेक विरुध्दही गुन्हा
दरम्यान केज ठाण्यात मध्यप्रदेशच्या वरदान कंपनी विरुध्द अशाच प्रकारची दुसरी एक तक्रार केज पं.स.चे कृषी अधिकारी अमोल डाके यांनी शनिवारी दिली. या कंपनीनेही केजमध्ये सोयाबीनचे बियाणे वितरित केले होते. मात्र शेतकर्यांनी पेरलेले या कंपनीचे वान जेएस 335, व इतर वाणाचे बियाणे उगवले नाहीत. अखेर वरदान बायोटेक प्रा.लि.उज्जन, (मध्यप्रदेश) या कंपनीविरुध्द शेतकरी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक मिसळे अधिक तपास करत आहेत.
Leave a comment