कडा । वार्ताहर
कडा (ता.आष्टी) येथील मुख्य बाजारपेठ व आंबेडकर चौकातील पाच दुकाने फोडून चोरट्यांनी हजारोचा ऐवज लंपास केला. याशिवाय मराठ गल्ली येथील परमेश्वर ढोबळे यांचे घर फोडले. रात्रीतून पाच ठिकाणी चोर्या झाल्यामुळे कड्यातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले.
कडा येथील आंबेडकर चौकामध्ये साईबाबा टी हाऊस ,साई कलेक्शन या दोन्ही दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. या दोन्ही दुकानाच्या गल्ल्यातील अनुक्रमे दोन हजार व तीन हजारांची रक्कम लंपास केली. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयासमोरील एक कापड दुकानाकडे वळवला. या दुकानाचे शटर तोडून गल्यातील पैसे लांबवले तर मुख्य बाजारपेठेतील विशाल भंडारी यांच्या कापड दुकानाच्या गल्ल्यातूनही रक्कम लंपास केली. त्यानंतर मराठ गल्ली येथील परमेश्वर ढोबळे यांचे घर फोडले मात्र तिथे फारसे काही हाती आले नाही.तसेच बारभाई गल्ली येथील ललित कटारिया यांचे किराणा दुकानाचे शटर तोडून गल्यातील 3 हजारांची रक्कमल लांबवली.एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोर्या झाल्यामुळे कड्यातील नागरिकांत घबराट पसरली असून पोलिसांची गस्त असतानाही चोर्या होतातच कशा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून त्यांची संख्या पाचपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
Leave a comment