परळीतील 5, बीडमधील 2 तर शिरुर, अंबाजोगाईतील प्रत्येकी एकाचा समावेश
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.4) आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा जिल्ह्यात वाढू लागला असून नागरिकांनी आता अधिक काळजी घेवून प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यात पहिल्यादांच 251 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. यातील 242 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सर्वाधिक 5 कोरोना बाधित परळी शहरात आढळून आले असून बीडमध्ये 2 तर शिरुरकासार तालुक्यातील राळेसांगवी येथे 1 आणि अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथील एकाचा बाधित रुग्णात समावेश आहे.
बीड जिल्ह्यातून शनिवारी (दि.4) तब्बल 251 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील 9 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात परळीतील 28,32, 29,35 व 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय भिवंडीहून राळेसांगवी (ता.शिरुर) येथे परतलेला 45 वर्षीय व्यक्ती, अजिजपुरा बीड येथील 40 वर्षीय महिला तसेच डीपी रोड बीड येथील 45 वर्षीय महिला आणि अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे पुण्याहून परतलेल्या 65 वर्षीय महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.
शनिवारी तपासणीला पाठवलेलेल्या स्वॅबमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-97, कोव्हीड केअर सेंटर बीड -41, स्वाराती ग्रा वै महाविद्यालय अंबाजोगाई-3, कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई -53 उपजिल्हा रुग्णालय परळी-14, उपजिल्हा रुग्णालय केज-15, ग्रामीण रुग्णालय माजलगाव-5,उपजिल्हा रुग्णालय गेवराई -17 आणि ग्रामीण रुग्णालय आष्टी येथून 6 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता. यातील 242 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान कोरोनाच्या निश्चित निदानासाठी एकाचवेळी, एकाचदिवशी इतके स्वॅब पाठवण्याची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या अहवालांकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.
आजपर्यंत 146 बाधित; आता 24 जणांवर उपचार सुरु
दरम्यान आष्टी तालुक्यातील कारखेल येथील 1 रुग्ण नगर जिल्ह्यात तर पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील 1 जण पुण्याच्या रुग्णालयात आणि बीडच्या बालेपीरमधील 1 जण औरंगाबादमध्ये कोरोना बाधित आढळून आला. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत एकुण बाधित रुग्णांची संख्या 137 वर पोहचली. त्यानंतर शनिवारी तपासणीला पाठवलेल्या 251 पैकी 9 जणांचे रिपोर्ट रात्री पॉझिटिव्ह आल्याने आजपर्यंत (4 जुलै) बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 146 झाली आहे. यातील 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत 24 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आनंदनगरमध्ये पूर्णवेळ संचारबंदी
अंबाजोगाई ग्रामीण हद्दीतील जोगाईवाडी परिसरातील आनंदनगरमध्ये शुक्रवारी एक कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाला.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशावरुन शुक्रवारी (दि.3) रात्री उशिरा आनंदनगर भागातील विलास देशपांडे यांचे घर ते बालासाहेब कोकाटे यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेटमेंट झोन घोषित करुन पुढील अनिश्चित कालावधीसाठी बंद करत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Leave a comment