अधीक्षक कार्यालयात ठाणे प्रमुखांना प्रशिक्षण
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनच्या कालावधीत बीड जिल्ह्यात मानसिक आजारी, डिप्रेशन आणि नैराश्यग्रस्त रूग्ण वाढत आहेत.अशा लोकांच्या मदतीसाठी बीड पोलिस दलाने ‘प्रोजेक्ट सहाय्यता’ हा मदत कक्ष सुरू केला आहे. पोलिस ठाण्यांमध्येही काही मनोरूग्ण किंवा मानसिक आजारी व्यक्ती येत असतात.अशा लोकांना ओळखण्यासाठी व त्यांचे कशाप्रकारे लक्षणे असतात यासाठी ठाणे प्रमुख आणि कर्मचार्यांना दि.2 व 3 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या गुन्हे बैठकांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह प्रशिक्षण देण्यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.मोहम्मद मुजाहिद व सर्व ठाणे प्रमुख उपस्थित होते. सध्या मानसिक आजारी रुग्ण वाढत असून त्यांना कसे ओळखावे,त्यांचे लक्षणे काय असतात,त्यांना कसे हाताळावे,काय उपचार पद्धती आहे,याबाबत डॉ. मुजाहिद यांनी माहिती देऊन पोलीस कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले.
डिप्रेशनमधील तसेच मानसिक आजारातून जाणारे लोक शक्यतो आपले दु:ख किंवा त्रास कोणाजवळ व्यक्त करत नाहीत. अशावेळी समाज आणि प्रशासनाने अशा लोकांना सहानूभूती दाखवणे गरजेचे आहे.अशा लोकांशी बोलल्यानंतर किंवा चर्चा केल्यानंतर त्यांची मानसिकता बदलून दु:ख कमी केले जावू शकते.यासाठीच बीड पोलिस दलाने प्रोजेक्ट सहाय्यता हा मदत कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
कोणीही नागरिक डिप्रेशन किंवा मानसिक आजारातून जात असेल तर त्याने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. आपल्या सहाय्यतेसाठी बीड पोलिस 24 तास तत्पर आहेत. आमच्याशी बोला,आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून तुम्हाला या कठीण प्रसंगातून निश्चित बाहेर काढू असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले. एखादा व्यक्ती मानसिक आजारातून जात असेल तर संबंधिताला या कक्षाच्या माध्यमातून व्यवसायिक समुपदेशन उपचार पुरवले जाणार आहे. बीड पोलिसांना यासाठी मानसोपचार तज्ञ डॉ.मोहम्मद मुजाहिद व डॉ.अशोक मते हे सहयोग करत आहेत.
Leave a comment