आरोग्य पथकाला सहकार्य करा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
बीड । वार्ताहर
बीड शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.सध्या बीडच्या नागरी आरोग्य केंद्रातर्फे शहरातील विविध भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे.याच अनुषंगाने आरोग्य पथकांद्वारे आता दररोज ऑक्सिमीटर वापरून आवश्यक नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासत जात आहे.नागरिकांनीही यासाठी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा व्यापक उपाययोजना राबवत आहे.कोरोना बाधीत रुग्ण आढळून येणार्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कंटेटमेंट झोन घोषित करून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात येत असून पुढील प्रक्रिया पार पाडली जात आहे.यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वच घटक नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वारंवार केले जात आहे.आज शनिवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आरोग्य पथकाकडून हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती दिली आहे.
त्यानुसार बीड शहरात आरोग्य पथकांद्वारे आता दररोज ऑक्सिमीटर वापरून आवश्यक नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासणीला सुरुवात केली असल्याचे सांगत प्रत्येक उपयोगानंतर या मशीनची स्वच्छता व सॅनिटाइज देखील करण्यात येत आहे.अशावेळी सर्वच नागरिकांनी यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरोग्य तपासणीच्यावेळी उपस्थित राहिले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
रेशन कार्डधारकांची यादी आता सूचना फलकावर
जिल्ह्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांच्या अद्यावत याद्या आता गावनिहाय याद्या सूचना फलकावर लावल्या जात आहे. नागरिकांनी आपले नाव यादीत आले की नाही याची खात्री करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे. दरम्यान लाभार्थ्यांच्या याद्या गावनिहाय सूचना फलकावर डकवण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या गेल्या आहेत.
Leave a comment