13 रिपोर्ट अनिर्णयीत तर 173 निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
बीड शहरातील अजिजपुरा भागात पुन्हा एक कोरोना बाधित रुग्णाची भर पडली आहे तर अंबजोगाईत स्वॅब घेतलेल्या गिरवली (जि.उस्मानाबाद) येथील 25 वर्षीय महिलेचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान 13 जणांचे रिपोर्ट अनिर्णयीत असून उर्वरित 173 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आता बीड जिल्ह्यात उपचार सुरु असणार्या रुग्णांची संख्या 15 झाली आहे.
बीड जिल्ह्यातून शुक्रवारी (दि.3) सकाळी सर्वाधिक 188 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात बीड जिल्हा सामान्य रुग्णालय 9,बीड कोव्हीड केअर सेंटर 54, आष्टी ग्रामीण रुग्णालय 16, केज उपजिल्हा रुग्णालय 34, परळी उपजिल्हा रुग्णालय 10, गेवराई उपजिल्हा रुग्णालय 13, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 15, अंबाजोगाई स्वाराती महाविद्यालय 7, आणि अंबाजोगाई कोव्हीड केअर सेंटरमधून 30 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता.
रात्री हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यात बीडच्या अजिजपुरा येथील 17 वर्षीय तरुणासह अंबाजोगाई रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या गिरवली (ता.भूम, जि.उस्मानाबाद) येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याशिवाय 13 जणांचे रिपोर्ट अनिर्णयीत तर उर्वरित 173 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
पंधरा जणांवर उपचार सुरु
दरम्यान आता बीड जिल्ह्यात आजपर्यंत बाधीत निष्पन्न झालेल्या रुग्णांची संख्या 133 झाली असून पैकी 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 6 जणांचा मृत्यू झाला असून आता जिल्ह्यात 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment