159 पैकी 155 अहवाल निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात गुरुवारी (दि.2) आणखी चार कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात बीड शहरातील 2 तर केज तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. उर्वरित 155 अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आसेफनगर बीड येथील 37 वर्षीय पुरुषासह अजिजपुरा बीड येथील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय केज तालुक्यातील भाटुंबा येथील 38 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिलेचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. भाटुंब्याचे हे दोघे जण औरंगाबादहून गावी परतलेले आहेत
बीड शहरात बुधवारी कोरोनाचे तीन बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिबंधात्मक व्यवस्था म्हणून बीड शहर 9 जुलैपर्यंत बंद करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. असे असतानाच गुरुवारी (दि.2)सकाळी बीड जिल्ह्यातून तब्बल 159 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात बीड जिल्हा रुग्णालयातून 47, बीड कोव्हीड केअर सेंटर 29, आष्टी ग्रामीण रुग्णालयातून 12, केज उपजिल्हा रुग्णालयातून 16, परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7, गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून 19, माजलगाव ग्रामीण रुग्णालयातून 3, अंबाजोगाईच्या स्वाराती महाविद्यालयातून 5 व कोव्हीड केअर सेंटर अंबाजोगाई येथून 20 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता. पैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह तर अन्य 155 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात 13 जणांवर उपचार सुरु
दरम्यान आता बीड जिल्ह्यात आजपर्यंत बाधीत निष्पन्न झालेल्या रुग्णांची संख्या 131 झाली असून पैकी 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तिघांचा बीड जिल्ह्यात, दोघांचा औरंगाबादला तर पुण्यात एकाचा मृत्यू झाला आहे.दरम्यान बुधवारी बीडमधून आणखी 4 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आता जिल्ह्यात 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment