सर्व 107 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याला मंगळवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी तपासणीला पाठवलेेल्या 108 पैकी 107 रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत. 1 स्वॅबचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. दरम्यान सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आजच्या अहवालाकडे लक्ष असलेल्या जिल्हावासियांची काळजी कमी झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 5 बाधीत रुग्ण सापडल्यानंतर मंगळवारी (दि.30) सकाळी तब्बल 108 जणांचे स्वॅब तपासणीला अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यात जिल्हा सामान्य रुग्णालय 20,बीड कोव्हीड केअर सेंटर 62, आष्टी ग्रामीण रुग्णालय 12, केज उपजिल्हा रुग्णालय 7, परळी उपजिल्हा रुग्णालय 4 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून 3 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता. रात्री उशिरा हे सर्व अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यातील 107 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर एक अहवालाचा निष्कर्ष निघू शकलेला नाही. या आठवड्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीला गेले होते. त्यामुळे रिपोर्ट काय येतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते.
पाच जणांना डिस्सार्ज, एकाचा मृत्यू; 10 जणांवर उपचार सुरु
मंगळवारी जिल्हयात 5 जण कोरोनामुक्त झाले. यात माळी गल्ली पाटोदा येथील 4, तर बीड शहरातील 1 रुग्णाचा समावेश आहे. आता 10 रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु असून यात छोटी राज गल्ली बीड येथील 4, सुर्डी (ता.आष्टी) येथील 3 तर अजिजपुरा बीड 1, दत्त मंदिरासमोरील गल्ली बीड 1, पेठ बीडमधील 1 अशा एकुण 10 रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यात एकुण 124 कोरोना बाधीत रुग्ण निष्पन्न झाले. यातील 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात तिघांचा बीड जिल्ह्यात तर औरंगाबाद येथे अन्य दोन जणांचा तर पुण्यात एकाचा मृत्यू झाला.103 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
लॉकडाऊनचा कालावधीत 31 जुलैपर्यंत वाढ
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 31 जुलै 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून त्यानुसार जिल्ह्यात दि.31 जुलै 2020 रोजी रात्री 12 वा.पर्यंत मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत कायम राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. यापूर्वी आदेशानुसार जिल्ह्यात 30 जून 2020 रोजीचे रात्री 12वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या कालावधीत 31 जुलै 2020 पर्यत वाढ झाली आहे.
Leave a comment