बीड । वार्ताहर
वीज ग्राहकांना देण्यात आलेले बील देयके जास्त आल्याबाबत अनेक घरगुती ग्राहकांच्या तक्रारी महावितरणकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी 27 जून पासून महावितरण कार्यालयाने सर्व उपविभागीय व शाखा कार्यालयात ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे अशी माहिती अधिक्षक अभियंता संजय सरग यांनी दिली.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रत्यक्ष मिटर रिडींग न घेता मागील महिन्याच्या वीज वापराच्या सरासरी प्रमाणात मार्च ते मे 2020 या कालावधीत ग्राहकांना महावितरण मार्फत वीज बीले देण्यात आली होती. जून 2020 या महिन्याचे बील विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष मिटर रिडींग घेवूनच देण्यात आलेले आहे. परंतू सदरील देयक जास्त आल्याबात अनेक घरगुती ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. या अनुषंगाने महावितरण बीडतर्फे मार्च ते मे 2020 या महिन्यात देण्यात आलेल्या वीज बीलामार्फत ग्राहकांचे शंका निरसन करण्यासाठी सर्व उपविभागीय कार्यालय व शाखा कार्यालयामध्ये 27 जून पासून ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व वीज ग्राहकांनी त्यांच्या वीज बीलाबाबत तक्रार असल्यास ग्राहक मेळाव्यास उपस्थित राहून शंकेचे निरसन करून घ्यावे असे आवाहन संजय सरग यांनी केले आहे.
Leave a comment